मुक्तपीठ टीम
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे गेले १६ दिवस गायब होते. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवास्थानाबाहेर पोलिसांच्या तावडीतून सुटून पळ काढला होता. या दोघांवर महिला पोलीस अधिकाऱ्याला जखमी केल्याचा आरोप होता, यामुळे या दोघांविरोधात ३५३ कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुरुवारी सत्र न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिल्यानंतर शुक्रवारी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी अखेर १६ दिवसांनी अवतरले आहेत. ‘शिवतीर्थ’ येथे या दोन्ही नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
संदीप देशपांडे, संतोष धुरींना मोठा दिलासा!
- शिवाजी पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे गेल्या अनेक दिवसांपासून गायब होते.
- पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी पथकही तयार केले होते.
- मात्र ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते.
- या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
- अखेर गुरुवारी या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आणि शुक्रवारी ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर हजर झाले.
देशपांडे यांच्या पोलिसांचे गंभीर आरोप?
- राज ठाकरे यांनी ४ मे पासून भोंग्यावरून दिलेला अल्टिमेटम संपला होता.
- यामुळे पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड सुरु केली होती.
- यात मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर आले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनी आपल्या वाहनात बसून पलायन केले.
- वाहनचालकाने वाहन अचानक पळवल्याने धक्का लागून एक महिला पोलीस अधिकारी खाली पडली आणि जखमी झाली.
- यामुळे पोलिसांनी या दोघांविरोधात कलम ३५३ (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य करण्यापासून बलपूर्वक रोखणे), २७९ (उतावीळपणे वाहन चालवणे) व ३३६ (दुसऱ्याच्या जिवाला धोका निर्माण करणे) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
- दरम्यान, देशपांडे यांना पलायन करण्यास मदत केल्याबद्दल त्यांचे वाहनचालक रोहित वैश्य तसेच, शाखा अध्यक्ष संतोष साळी यांना पोलिसांनी अटकही केली होती.
- या दोघांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते, तर देशपांडे व धुरी यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते.
- त्याविषयीच्या सुनावणीअंती न्यायालयाने त्यांचे अर्ज मंजूर केले.