अपेक्षा सकपाळ/ मुक्तपीठ टीम
गेले १५ दिवस महाराष्ट्रात सत्तेचा महासंघर्ष रंगला होता. सत्तेसाठी गदारोळ सुरु होता. त्याचवेळी राज ठाकरेंच्या मनसेचे एक नेते मनोज चव्हाण हे मात्र पाणीटंचाईग्रस्त भागात WATERMAN बनून पाणीपुरवठा करत होते. या वॉटरमॅनचं सत्कार्य मांडणारी चांगली बातमी राजकीय गदारोळात उठून दिसतेय.
एकीकडे खोल खोल पाणी. काही ठिकाणी तर तेही नाही. विहीरी, नद्या कोरडंठाण. पाणी असलंच तर ते फक्त तहानलेल्यांच्या डोळ्यांमध्ये. उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या पेठ आणि विदर्भाच्या मेळघाटात ही दुरवस्था तर त्याचवेळी महाराष्ट्रातील आमदारांची मौजमजा…
हे असो किंवा ते. सर्वांचा गदारोळ सुरु होता सत्तेसाठी. त्याचवेळी सामान्यांची तहान पाहून कासाविस झालेला एक राजकीय नेता महाराष्ट्रात पुढे सरसावला. मनोज चव्हाण. या पाणीटंचाईग्रस्त भागासाठी मनोज चव्हाण ठरले वॉटरमॅन.
जून म्हणजे पावसाची आनंदवार्ता आणणारा महिना. पण तो कोरडाच गेला. त्यामुळे विदर्भाच्या मेळघाटातील खडीमल सारखी असंख्य गावं आणि नाशिकमधल्या पेठ तालुक्यातील तोंडवल सारख्या गावांनी भीषण पाणीटंचाई अनुभवली. पाणी म्हणजे जीवनच. पण तेच नसल्याने जीवनच कोरडं पडलं. विहीरींना पाणी नसल्यानं तेथील गावकऱ्यांना पाच पाच किलोमीटरचा प्रवास करून पाणी आणावे लागलं. तेथे टॅंकरने पाणी पुरवठा केला जात होता, पण तो पाच दिवसातून एकदाच. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणीदूत म्हणून ओळखले मनसेचे सरचिटणील मनोज चव्हाण यांच्या कानी या भीषण परिस्थितीची माहिती गेली. त्यांनी युध्दपातळीवर waterman in action मोहीम राबविण्यास सुरूवात केली. मेळघाट आणि नाशिकमधील त्या गावांना पाण्याच्या टॅंकर्सची सेवा सुरु झाली. संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्तेंसारखे सेलिब्रिटीही मनोजचं कौतुक करतात, ते काही उगाच नाही! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना १९८६पासून ते आजवर अगदी जवळ प्रत्येक कार्यात सोबत ठेवलं ते काही उगाच नाही!
हे पहिल्यांदाच घडतंय असं नाही. त्यांना महाराष्ट्रातील अनेक गावं पाणीदूत म्हणून ओळखतात, तेही उगाच नाहीत. महाराष्ट्रातील ज्या गावात पाणी नसेल त्या गावात डाॅ.मनोज चव्हाण यांची मातोश्री ट्रस्ट आईच्या मायेने धावत जावून सर्वांची तहान भागवत असते. त्याच बरोबर पाणी अडवा पाणी जिरवा आणि पाणी वाचवा अशा मोहीमा देखील मातोश्री ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने राबवण्यात येत आहेत. मातोश्रीसारख्या अशा असंख्य संस्थाचं कार्य असं चालतं म्हणूनच आपला महाराष्ट्र संकटांवर मात करत पुढे चालत राहतोय…
नाही तर ज्यांचं काम खरंतर सामान्यांच्या संकट निवारणाचं ते आमदार भलत्याच जगात होते. कोरड्या पडलेल्या विहिरी पाहून तहानलेल्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यापेक्षा सत्तेच्या ओलाव्यासाठी भलतंच काही बडबडत होते…काय ती झाडी…काय ते डोंगर…काय ते हाटिल…सारंच ओक्के!