मुक्तपीठ टीम
राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. राजधानी मुंबईत तर कोरोनाचा विस्फोट पाहिला तर आता चिंता वाढत आहे. एकीकडे गेल्या २४ तासात मुंबईत तब्बल १५ हजारावर नवे रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे आयुक्त इक्बाल चहल यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यातील चर्चेनंतर सध्या तरी राज्यात लॉकडाऊनचा विचार नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता २० हजार रुग्णसंख्या जर झालीच तर लॉकडाऊन लागणार निर्बंध वाढणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तीन ते चार दिवसांत कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय
- मुंबईत बुधवारी गेल्या २४ तासात तब्बल १५ हजार १६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
- कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा प्रचंड चिंता वाढवणारा आहे.
- कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर हा थेट २५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
- पुढील आठवडा मुंबईसाठी अधिक काळजीचा आहे.
- मुंबईत पुढील तीन ते चार दिवसांत कठोर निर्बंध लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
- पुढील चार दिवसांत वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येवर लक्ष असून त्यानंतर कठोर निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा इशारा
- देशासह राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
- अशातच देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्येही कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.
- मुंबईत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
- अशातच जर मुंबईतील दैनंदिन रुग्णांचा आकडा २० हजारांच्या पार पोहोचला तर मुंबईत कठोर निर्बंध लादण्याचा विचार केला जाऊ शकतो, असा इशारा मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.