मुक्तपीठ टीम
टाटा समूहाचं प्रमुखपद आणि त्यानंतर थेट टाटांशीच संघर्ष आणि मग पायउतार व्हावं लागणं. भारतातच नाही तर जगभरात गाजलेल्या त्या उद्योगसत्ता संघर्षानंतर सायरस मिस्त्री यांचं नाव चर्चेत आलं. पण सायरस मिस्त्री आणि ते वारसा चालवत होते, तो शापुरजी पालोनजी हाही भारतातील एक नामांकित उद्योग समूह आहे. रविवारी पालघरमध्ये त्यांचा धक्कादायक अपघाती मृत्यू ओढवल्यानंतर त्यांच्या महत्वाकांक्षी, आक्रमक आणि वेगवान व्यावसायिक शैलीतील कारभाराची आठवण काढली जात आहे.
सायरस मिस्त्री : १९६८ ते २०२२…वेगवान उद्योग प्रवास आणि धक्कादायक अंत!
- सायरस मिस्त्री यांचं संपूर्ण नाव सायरस पालोनजी मिस्त्री
- सायरस मिस्त्री यांचा जन्म ४ जुलै १९६८ रोजी झाला होता.
- मुंबईतील पालोनजी मिस्त्री या श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातील जन्म असणारे सायरस हे त्यांच्या वेगवान आणि आक्रमक धोरणांसाठी ओळखले जात.
- सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी ग्रुपचे प्रमुख पल्लोनजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र होते.
- या समूहायाची सुरुवात १९व्या शतकात पल्लोनजी मिस्त्री यांच्या आजोबांनी सुरू केलेल्या बांधकाम कंपनीतून झाली होती.
- मिस्त्री हे मुंबईच्या पारशी समाजातीलच नाही तर संपूर्ण कॉर्पोरेट जगतातील एक महत्वाचं नाव.
- सायरस यांनी इंग्लंडमधील उच्च शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी मुंबईतील प्रतिष्ठित कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतले.
- त्यांनी इंपीरियल कॉलेज, लंडन येथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी आणि लंडन बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
- १९९१मध्ये त्यांनी कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला.
- शापूरजी पालोनजी अँड कंपनी लिमिटेड या प्रमुख बांधकाम कंपनीचे संचालक झाले.
सायरस मिस्त्रींच्या नेतृत्वाखाली शापूरजी पालोनजी समुहाचा वेगवान विस्तार!
- सायरस मिस्त्री यांच्या दोन दशकांच्या कारकीर्दीत शापूरजी पालोनजी समुहाने वेगवान विस्तार केला.
- समुहाने आपला विस्तार पारंपारिक बांधकामाच्या पलीकडे मोठ्या अभियांत्रिकी प्रकल्पांपर्यंत वाढवला.
- या नव्या क्षेत्रांमध्ये पॉवर प्लांट आणि कारखान्यांच्या इमारतींचा समावेश होता. मध्य पूर्व आणि आफ्रिकेत मोठे प्रकल्प हाती घेऊन समुहाने परदेशातही धडक दिली.
सायरस मिस्त्री यांचा टाटा समुहात प्रवेश
- सायरस यांचे वडिल पालोनजी मिस्त्री २००६मध्ये टाटा समूहाच्या संचालक मंडळातून निवृत्त झाले आणि त्यावेळी ३८ वर्षीय सायरस मिस्त्री यांनी त्यांची जागा घेतली.
- पालोनजी मिस्त्री हे समूहाचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत.
- शापूरजी पालोनजी समूहासोबतच सायरस यांनी अनेक टाटा कंपन्यांचे संचालक म्हणून कार्यरत झाले.
- नोव्हेंबर २०११मध्ये सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाचे उपाध्यक्ष बनवण्यात आले,
- टाटा समूहाचे प्रमुख असलेल्या रतन टाटा यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्यावर प्रमुखपदाची जबाबदारी आली.
- २०१२ मध्ये ते अधिकृतपणे रतन टाटा यांच्यानंतर टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. मिस्त्री यांचा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ २०१६च्या ऑक्टोबरपर्यंत होता.
- चार वर्षांनंतर त्यांना अचानक बडतर्फ करण्यात आले.
टाटा समूहाचं नेतृत्व गेल्यानंतर सायरस मिस्त्रींचा संघर्ष सुरुच आणि आता…!
- टाटांशी व्यावसायित धोरणांवर मतभेद हे त्यांच्या पदच्युतीचे मुख्य कारण होते. मिस्त्री यांनी त्यांच्या गच्छंतीला आव्हानही दिले.
- भारताच्या नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने २०१८मध्ये त्यांची याचिका फेटाळली. परंतु तो निर्णय २०१९मध्ये राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने रद्द केला.
- दोन वर्षांनंतर २०२१मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मिस्त्री यांची बडतर्फी कायम ठेवली. टाटांचा निर्णय योग्य ठरवला.
- आताही टाटा समूहाने नुकताच टाटा समूह आणि टाटा कंपन्यांचे नेतृत्व वेगवेगळं ठेवण्याचा घेतलेला निर्णय त्यांना पटलेला नव्हता.
- त्यांच्या व्यावसायिक जीवनात ते आपल्या शैलीत सक्रिय असतानाच आता त्यांच्या अपघाती निधनाची बातमी सर्वांनाच धक्का देणारी ठरली आहे.