मुक्तपीठ टीम
२० ऑगस्ट जागतिक डास दिन. याच दिवशी २० ऑगस्ट १८९७ रोजी डॉ रोनाल्ड रॉस यांनी कलकत्ता मध्ये हिवतापाचे जंतू हे डासांच्या पोटात आढळून आल्याचा शोध लावला व हा शोध आपल्याच देशात लावल्याने या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे हा दिवस जागतिक मच्छर दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तो साजरा करताना दरवर्षी एक संकल्पना ठरवली जाते या वर्षीची संकल्पना ‘हिवतापाचे उच्चाटन करूया’ ही आहे. त्याअनुषंगाने राज्याची कीटक जन्य आजारारांची माहे जानेवारी २१ ते १४ ऑगस्ट २१ अखेरची परिस्थिती खालील प्रमाणे आहे:
- राज्यामध्ये हिवतापाचे ७९०८ रुग्ण
- डेंगीचे २५५४ रुग्ण व ११ मृत्यू
- चिकांनगुनियाचे ९२८ रुग्ण आढळून आले
राज्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना खालिल प्रमाणे
१. राज्यातील पाच हिवताप संवेदन संवेदनशील जिल्ह्यामध्ये घरोघरी कीटकनाशक फवारणी :
ठाणे, रायगड, गोंदिया,चंद्रपूर आणि गडचिरोलीतील ११८८ गावातील ५.२७ लाख लोकसंख्येत या कीटक नाशकाची पहिली फवारणी फेरी पूर्ण.
२. राज्यातील १० जिल्ह्यामध्ये ४२६००० इतक्या कीटकनाशक भारित मच्छरदाणी चे वाटप
३ .राज्यातील हत्तीरोग रुग्णांना मोर्बिडीटी मॅनेजमेंट कीट वाटप तर जूनअखेर २०३१ इतक्या हायड्रोसिल शस्त्रक्रिया
४. डेंगी नियंत्रणासाठी १५ मनपाना डासोत्पत्ती नियंत्रणासाठी चार महिन्याकरिता मनुष्यबळ वाटप
५. माहे जानेवारी पासून घरांची कीटकशास्त्रीय तपासणी त्यामध्ये ४५३५३३ घरे व ५५८२६४ भांडी दूषित आढळून आलेली आहेत. आज अखेर ६८४ गावामध्ये गृह निर्देशांक हा १० टक्क्यांपेक्षा जास्त दिसून आला.
६. यापैकी ४३१६६२ भांडी रिकामी केली आणि १२६६०२ मध्ये टेमिफॉस हे अळी नाशक टाकले.
जगामध्ये डासांच्या जवळ जवळ ३५०० प्रजाती आहेत या प्रजाती साधारणत: अनोफेलीस, क्युलेक्स , एडीस व मंसोनिया चार जमातींमध्ये विभागलेले आहेत. या चार जमाती वेवेगळ्या आजारांचा प्रसार करतात. अनाफेलिस डासापासून हिवतापाचा प्रसार होतो, कुलेक्स डासा पासून हत्तीरोग व जपानी मेंदुज्वर या आजाराचा प्रसार होतो तर एडीस डासापासून झिका, डेंग्यू चिकन गूनिया या आजारांचा प्रसार होतो तर मंसोनिया डासापासून हत्तीरोग होत असतो. हे विविध आजार पसरविणारे डास व आजार यांची वैशिष्टे खालील प्रमाणे
हिवतापाचे प्रसार करणारे डास
हिवताप हा एक थंडी वाजून येणारा ताप असून या आजाराचे सर्वाधिक प्रमाण हे आफ्रिकेमध्ये व त्यानंतर आशिया खंडामध्ये दिसून येते या आजाराचा प्रसार करणाऱ्या डासाचे नाव आहे अनाफेलिस. महाराष्ट्रामध्ये ॲनाफिलीस या डासाच्या तीन प्रजाती पासून हिवताप होत असतो त्या आहेत अनोफेलिस क्युलिसीफिसेस, अनोफेलिस स्टिफेंसी, अनोफेलिस फ्लुवातलीस या डासांच्या जीवनशैलीचा जर विचार केला तर हा डास साचलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालत असतो. या डासाच्या अळीचे वैशिष्ट्य म्हणजे ती पाण्याच्या पृष्ठभागावर समांतर तरंगत असते. या डासाच्या पंखावर पांढरे ठिपके असतात व हा डास भिंतीशी 45 अंशाचा कोन करून बसतो. हे डास रात्री अथवा पहाटे चावत असतात शक्यतो गाढ झोपे मध्ये असतानाच हे डास लोकांना चावत असतात एकदा चावल्यानंतर हा डास तीन दिवस पूर्णपणे भिंतींवर विश्रांती घेत असतो त्यामुळे या डासाच्या प्रतिबंधासाठी आपण घरोघरी नियमित फवारणी केली जाते किंवा कीटकनाशक भारीत मच्छरदानीचा वापर केला जातो.
डेंगी, चिकनगुनिया व झिका आजार
हा आजार हा एडीस डासाच्या प्रजाती पासून होतो. महाराष्ट्रामध्ये या प्रजातीच्या तीन प्रजाती य आजारांचा प्रसार करतात. एडीस इजीप्ताय, एडीस अल्बोपिक्टस व एडीस विटाटस यांचे मार्फतच या आजारांचा प्रसार होत असतो या डासांची वैशिष्ट्य म्हणजे यांच्या अंगावर आणि पायावर पांढरे पट्टे दिसून येतात तसेच रंगाने काळपट असतात. हे डास दिवसा चावतात व वारंवार चावतात. त्यामुळे घरातील सर्व लोक बाधित करण्याची शक्यता असते. हे डास विश्रांतीसाठी लोबकळणारे वस्तू, पडदे, वायर या वरती तसेच अंधाऱ्या व थंड जागी विश्रांती घेत असतात. त्यामुळे या आजारांमध्ये प्रामुख्याने हे डास मारण्यासाठी धूर फवारणी केली जाते या डासाची आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा डास साचलेल्या व साठवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालतो. हा डास फुटकी टायर्स डबे बाटल्या इत्यादी घराच्या आजूबाजूला जे निरुपयोगी साहित्य असते त्यामध्ये पावसाचे पाणी साचून तयार झालेल्या ठिकाणी अंडी घालत असतो. घरामधील फुलदाण्या, फ्रिज, कुलर यामध्ये त्याचे प्रजनन होत असते. त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व पाणीसाठी झाकून ठेवणे व निरुपयोगी साहित्याची विल्हेवाट लावणे.
हत्तीरोग
हत्तीरोग हा विकसनशील देशांना अत्यंत भेडसावणारा असा हा आजार आहे. खरतर या आजाराची गणना ही NTD ( Neglected Tropical Disease) मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. खऱ्या अर्थाने हा दुर्लक्षित परंतु सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आजार आहे. या आजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पायाला येणारी सूज ही एकदा सुरु झाली थोड्याफार पद्धतीने नियंत्रित करता येते. परंतु एकदा हा आजार झाला तर तो मात्र शेवटपर्यंत बरा होत नाही. ते व्यंग घेऊन त्या व्यक्तीला जन्मभर रहावे लागते. हत्ती रोगाचा प्रसार हा कूलेक्स डासांच्या प्रजाती पासून होतो. हत्तीरोग हा कूलेक्स क्विंकीफिसीयाटुस या प्रजातीपासून होतो. या डासांचे प्रजनन हे घाणेरड्या तसेच प्रदूषित पाण्यामध्ये होत असते. गटारी, नाले, सेप्टिक टॅंक मध्ये अंडी घालत असतो. या आजारात गटारी वाहती करणे सेप्टिक टॅंक ला जाळ्या बसवणे, वेंट पाईपला जाळी बसवणे इत्यादी उपाय योजना केल्या जातात. या डासाची चावण्याची सवय ही संध्याकाळच्या वेळेला तिन्हीसांजेच्या वेळेला असते
जपानी मेंदुज्वर
हा आजार कूलेक्स विष्णूई या प्रजातीच्या डासांपासून होत असतो. हा डास प्रमुख्याने जिथे भात शेती किंवा पान वनस्पती आहेत अशा ठिकाणी प्रजनन करतो या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे माणसाला या आजाराची लागण ही अपघाताने होते परंतु या आजाराची तीव्रता लहान मुलांच्या मध्ये जास्त आहे. हे डास विश्रांतीसाठी घराच्या बाहेरच्या बाजूला झाडाझुडपा मध्ये विश्रांती घेतात त्यामुळे या आजारांमध्ये आपण घरा मध्ये तसेच घराबाहेर धूर फवारणी करत असतो.
डासामुळे पसरणाऱ्या आजारांमुळे होणारे दुष्परिणाम
• यामुळे बाधित लोकांची तसेच त्यामधील मृत्यूंची संख्या वाढते.
• औषधावरील खर्च वाढतो
• मनुष्यबळाचा नाश होतो
• देशाचे आर्थिक नुकसान होते
• डासांच्या नायनाटासाठी किमती कीटकनाशकांचा वापर केला जातो याचा दुष्परिणाम मनुष्य तसेच इतर उपयोगी कीटकांवर होतो.
या डासांची वाढ रोखणेसाठी खालील सोप्या उपाययोजना कराव्यात
- डासांना प्रतिबंध करण्यापूर्वी डासांचे जीवन चक्र समजून घ्या…
या डासांना प्रतिबंध करण्यापूर्वी डासांचे जीवन चक्र समजून घेणे आवश्यक आहे. - प्रत्येक डास हा दर तीन दिवसांनी 150-200 अंडी घालत असतो.
- या अंड्यातून एक ते दोन दिवसात अळी तयार होते.
- या अळीच्या चार अवस्था झाल्यानंतर त्याचा कोष तयार होतो व या कोषातून संपूर्ण डास साधारणतः 8-12 दिवसांमध्ये तयार होत असतो.
- अंडी अळी कोष यांची वाढ ही पाण्यात होत असते.
- त्यामुळे ही वाढ पाण्यातच रोखणे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
- कारण एकदा प्रौढ डास तयार झाल्यानंतर त्याला पकडणे किंवा त्याला मारणेसाठी खूप किमती कीटक नाशके वापरावी लागतात.
- त्यात ती दिलेल्या मात्रेत डासापर्यंत जाणे महत्त्वाचे आहे तसे झाले नाही तर डासामध्ये प्रतिरोध निर्माण होण्याची शक्यता असते.
- त्यामुळे पाण्यातील अळीला मारणे केंव्हाही सोपे.
- हे कमी खर्चिक आहे.
त्यामुळे खालील सोप्या उपाय योजना अमलात आणल्यास निश्चितच या आजारांना प्रतिबंध करता येईल.
डास निर्मूलनासाठी अकरा कलमी कार्यक्रम
1.घरातील गावातील सर्व पाणी साठे वाजाते करावेत
2.साठवलेल्या पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत
3.जे सिमेंटचे कंटेनर रिकामे करता येत नाहीत अशामध्ये गप्पी मासे किंवा टेमिफोस याअळीनाशकांचा वापर करावा
4.गावांमध्ये कोरडा दिवस पाळण्यात यावा
5.वेंट पाइपला जाळ्या बसवावेत
6.गावातील निरुपद्रवी निरुपयोगी असणाऱ्या टायरचे एकत्रित संकलन करून त्याचा नायनाट केलेस २५ टक्के रुग्ण संख्येत घट होऊ शकते.
7.गटारी वाहती करावीत
8.घराच्या दारे खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.
9.रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा
10.दिवसा पूर्ण कपड्यांमध्ये राहावे
11.संध्याकाळी घरामध्ये धूर करावा
जनतेसाठी आवाहन
• ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवावे.
• कोणताही ताप अंगावर काढू नये.
• या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत आहे तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा.
• घराच्या आजू बाजूला पाणी साठून देऊ नका.
• कोणत्याही परिस्थीतीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण करू नका.