मुक्तपीठ टीम
भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांना थेट मोदी सरकारने सुरक्षा पुरवली आहे. मोदी सरकारने दिलेल्या सुरक्षा कवचमध्ये तब्बल तब्बल ४० सीआयएसएफ जवानांचा समावेश आहे. एखाद्या केंद्रीय मंत्र्यापेक्षाही सोमय्या यांना जास्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे. किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतल्याने सोमय्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. महाविकासआघाडी सरकारकडून धमक्या येत असल्याचं सांगत किरीट सोमय्यांनी केंद्राकडे सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सोमय्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. त्याचबरोबर लवकरच भाजपाने उमेदवारी नाकारल्याने हुकलेल्या लोकसभा खासदारकीचं परिमार्जन करण्यासाठी राज्यसभेची खासदारकी दिली जाण्याची चर्चा आहे.
कशी असते झेड सुरक्षा?
- केंद्र सरकारकडून X, Y, Z, Z प्लस अशा प्रकारच्या सुरक्षा पुरवल्या जातात.
- झेड दर्जाच्या सुरक्षा कवचामध्ये २२ जवान असतात.
- यामध्ये ४ किंवा ५ NSG कमांडोंचा समावेश असतो.
- एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचादेखील यात समावेश असतो.
- ३ मिनिटांत कुठल्याही प्रसांगाला सामोरं जाण्यासाठी सीआयएसएफ जवान सज्ज असतात.
- सोमय्यांच्या घराच्या बाजूलाच बॅरेक बनवून सुरक्षा रक्षकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.
का पुरवली गेली सोमय्यांना झेड सुरक्षा?
- काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांनी मविआ सरकारमधल्या ११ नेत्यांच्या कथित भ्रष्टाचारावरुन त्यांच्या नावाची यादीच जाहीर केली होती.
- मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या कॅबिनेट मंत्र्यांनी घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.
- यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापासून ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचाही समावेश आहे.
- तसंच परिवहनमंत्री अनिल परब यांच्यापासून ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ११ जणांची नावं आहेत.
- ठाकरे यांचं इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार, असा इशारा त्यांनी दिलाय.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही त्यांनी दिवाळीपर्यंत बॅग घेऊन तयार राहण्यास सांगितले आहे.
- शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्याविरोधातही त्यांनी ईडी कारवाईची मागणी केली.