मुक्तपीठ टीम
हिंदूचं श्रद्धास्थान आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या केदारनाथचे दरवाजे आज उघडले गेले आहेत. नेहमीच्या प्रथेप्रमाणे हिवाळ्यात केदारनाथचे दरवाजे बंद करण्यात आले होते. आज सोमवारी पहाटे ५ वाजच्या सुमारास केदारनाथांची परंपरेनुसार पूजा करण्यात आली. पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यावेळी कोणत्याही भाविकांना दर्शनाची परवानगी नव्हती.
दरवाजे उघडण्यापूर्वी आदल्या दिवशी रविवारी मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी सर्वसामान्यांना कोरोनाची परिस्थिती पाहता, घरीच राहून पूजा करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी सांगितले की या काळात केदारनाथचे रावल (मुख्य पुजारी) श्री भीमाशंकर लिंगम जी यांच्या नेतृत्वात मर्यादित संख्येने पुजारी मंदिरात नियमितपणे बाबा केदारनाथची उपासना करतील. सध्या भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देता येणार नाही.
चार धाम यात्रा होणार नाही
• या वेळी चार धाम यात्रा पुढे ढकलण्यात आली असल्याचे राज्य सरकारने आधीच जाहीर केले आहे.
• केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्यापूर्वी यमुनोत्री १४ मे आणि गंगोत्री १५ मे रोजी उघडण्यात आले आहेत.
• तिथेही दर्शनांवर निर्बंधांची व्यवस्था राबवण्यात आली. भाविकांच्या प्रवेशांवर बंदी होती.
• दरवर्षी हिवाळ्यानंतर चार धाम म्हणून ओळखल्या जाणार्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडले जातात.
• गेल्यावर्षी कोरोनामुळे चार धाम यात्रा उशिरा सुरू झाली होती.
• यावेळी त्या यात्रा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
• मर्यादित संख्येने पुजारी मंदिरात नियमित पूजा करणार आहेत.
• कोरोनावरून जारी केलेल्या एसओपीमध्येही सरकारने याचा उल्लेख केला आहे.
मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या वेळी केदारनाथ मंदिराला फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच बद्रीनाथ धामचे दरवाजेही १८ मे रोजी उघडले जातील, परंतु भाविकांना येण्यास परवानगी दिली जाणार नाही.