मुक्तपीठ टीम
उत्तराखंडमधील केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम ही मंदिर म्हणजे हिंदू श्रद्धाळूंची भक्तिभावानं भेट देण्याची पवित्र स्थानं. हिवाळ्यात हिमवृष्टीमुळे त्या दोन मंदिरांमधील दर्शन बंद असते. हिवाळ्यानंतर मंदिराचे द्वार उघडण्याचा मुहुर्त मुख्य पुजारी ठरवतात. आता केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, महाशिवरात्रीनिमित्त ओंकारेश्वर मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमात मुख्य पुजारी रावल भीमाशंकर यांच्या उपस्थितीत पंचांग मोजल्यानंतर केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची वेळ ठरवण्यात आली. सहा मे रोजी वृश्चिक राशीत सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उघडले जातील असे ठरले. त्याचबरोबर बद्रीनाथ धामचे दरवाजे ८ मे रोजी उघडण्यात येणार आहेत.
केदारनाथ-बद्रीनाथ धामचे दरवाजे लवकरच उघडणार, उत्सवाचे नियोजन आणि जय्यत तयारी सुरू
- मुहूर्त काढण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय, केदारनाथचे माजी आमदार मनोज रावत, उखीमठचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र वर्मा यांच्यासह धार्मिक आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
- हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीमुळे केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारही धामांचे दरवाजे भाविकांसाठी बंद करण्यात आले होते, जे आता एप्रिल-मेमध्ये पुन्हा उघडले जातात.
- बाराव्या ज्योतिर्लिंगातील अग्रगण्य भगवान केदारनाथचे दरवाजे उघडण्यासोबतच उखीमठ ते कैलास या पंचमुखी जंगम देवता उत्सव डोलीच्या प्रस्थानाची तारीखही निश्चित करण्यात आली होती.
- बाबा केदारनाथची डोली हिवाळी आसनस्थान असलेल्या ओंकारेश्वर मंदिरातून २ मे रोजी धामकडे प्रस्थान करेल.
- त्याआधी १ मे रोजी भगवान भैरवनाथाची पूजा केली जाणार असून २ मे रोजी बाबा केदार यांची डोली सभामंडपात आणल्यानंतर ही डोली धामकडे रवाना होईल.
- डोली गुप्तकाशीमध्ये पहिला रात्रीचा मुक्काम करणार आहे. ३ मे रोजी रामपूरमध्ये रात्रभर मुक्काम केल्यानंतर डोली गौरीकुंडला रवाना होईल.
- ५ मे रोजी बाबा केदार यांचा पंचमुखी उत्सव डोली धामला रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ मे रोजी बाबा केदारनाथचे दरवाजे उघडले जातील.
पाहा व्हिडीओ: