जगदीश ओहोळ
आज २१ व्या शतकात पत्रकारितेची व्याख्याच बदलून गेलेली आपल्याला दिसत आहे. या बदलत्या काळानुसार बदलत्या संसाधनांचा वापर करून ज्यांना येथे टिकून राहता आलं आणि बातमी शोधता आली तेच आज पत्रकार म्हणून आपल्याला आठवतात व महाराष्ट्रात दिसून येत आहेत. त्यातीलच महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्रातील एक महत्वाचं नाव म्हणजे तुळशीदास भोईटे व आज अगदी एक वर्षाचं झालेलं त्यांचं ‘मुक्तपीठ’
खरंतर या महाराष्ट्राला व्यासपीठ, विचारपीठ हे शब्द रोज ऐकायची सवय आहेच पण आता या सगळ्यातून वेगळं आणि अचूक असणार आणि प्रत्येकाला आपलं वाटणारं ‘मुक्तपीठ’ भोईटे सर व त्यांच्या टीमने उभं केलं व आज महाराष्ट्रातील कोणीही या मुक्तपीठावर व्यक्त होऊ शकतो, आवाज उठवू शकतो… हे या मुक्तपिठाचं यश आहे.
जास्त काही नाही फक्त ३६५ दिवसाचं झालं आज आपलं ‘मुक्तपीठ’ ऐन कोरोनाच्या महामारीत सुरू झालेल्या मुक्तपीठानं बातम्यांसोबत लोकांना आनंद दिला, धीर दिला व एक नवी प्रकाशाची वाट ही दिली.
महाराष्ट्राच्या बातमी पटलावर अशी कित्येक ऑनलाईन माध्यमं येतात आणि जातात, त्यांची गिणती ही होत नाही, पण मुक्तपीठने एक नवी ओळख निर्माण केली. रोज सकाळी येणारं मुक्तपीठचं ‘मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्यांचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र’ अनेकांना आश्वासक वाटतं, त्यांना त्याची सवय झाली. “बजावा हक्क, व्हा अभिव्यक्त!” हे आवाहन करत महाराष्ट्रातील कित्येक नवं तरुण तरुणींना लिहीतं व बोलतं केलं.
खरंतर कित्येक वर्षे मुख्य प्रवाहात टीव्ही न्यूज चॅनेल्सवर संपादक, पत्रकार म्हणून काम पाहिलेले दिर्घनुभवी संपादक तुळशीदास भोईटे या नव्या माध्यमात जे अभिनव बदल व प्रयोग करत आहेत ते महाराष्ट्राच्या पत्रकारिता इतिहासात दखल घेण्यासारखेच आहेत. नव्या तरुणांना सोबत घेऊन सकारात्मक व रोजगाराच्या बातम्या देऊन त्यांनी जो प्रयोग केला तसा प्रयोग त्यांच्या नंतर आजच्या अनेक मुख्य माध्यमांनी ही केला पण त्यांना ते जास्त काळ जमलं नाही. पण मुक्तपीठ ने आज ही ते सातत्य जपलं आहे.
अनेक मुद्दे असे असतात की ज्यांना प्रस्थापित माध्यम स्पर्श करत नाहीत , त्या मुद्द्यांना बेधडकपणे आवाज दिला ते ‘मुक्तपीठ’ ने.!
सुरवातीच्या काळातच ‘शिक्षक भरती करा’ म्हणून न्यायासाठी शेकडो किलोमीटर चालत येणाऱ्या तरुणाईचा आवाज बनलं ते ‘मुक्तपीठ’ मग गिरीश कुबेराच्या पुस्तकाचा वादग्रस्त विषय असेल, त्यावर तर कोणीच बोलायला लिहायला तयार नव्हतं तेव्हा त्यावर आवाज उठवला तो आवाज म्हणजे ‘मुक्तपीठ’ आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत ‘केंद्र सरकार – राज्य सरकार’ हा जो वाद चाललेला असतो, त्यातून विविध योजनांच्या बाबतीत महाराष्ट्रावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ‘मुक्तपीठ’ ने केलं. व मुक्तपीठ महाराष्ट्राचा आवाज बनलं.
आजच्या एसटी कर्मचारी संपावर ‘मुक्तपीठ’ने जी भूमिका घेतली, कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आवाज उठवला, व एसटी हाच कसा विकासाचा महामार्ग आहे हे महाराष्ट्राला दाखवून दिलं. एकाच वर्षात असे कित्येक प्रश्न व मुद्दे ‘मुक्तपीठ’ ने लावून धरले व तडीस नेले. त्याबद्दल खरंतर महाराष्ट्राच्या वतीने ‘मुक्तपीठ’ चं अभिनंदन!
एका जंगलाला आग लागली तेव्हा सारे प्राणी जंगल सोडून जीव वाचवत पळत होते, पण तेव्हा एक चिमणी पाणवठ्यावरून चोचीत पाणी आणून आगीवर टाकण्याचा प्रयत्न करत होती.तेव्हा इतर प्राणी पक्षी तिला हसत होते व म्हणाले, “अग वेडी आहेस का, तुझ्या चोचीतील पाण्याने ही आग विझनार आहे का.? चल इथून” तेव्हा ती चिमणी म्हणाली ‘ माझ्या चोचीतील पाण्याने आग विझेल की नाही माहीत नाही, पण या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणारे अथवा पळून जाणाऱ्यात नव्हे तर “आग विझवणाऱ्यात असेल!”
मुक्तपीठ नेमकं हे काम करतय, महाराष्ट्राच्या , लोकांच्या धकाधकीच्या अग्निमय वातावरणात सकारात्मक, गुड न्यूज मॉर्निग देऊन , कोरोना काळात स्वप्न हरवत चाललेल्या लोकांना आधार देऊन, रोजगाराची बातमी देऊन.! इतिहास या कामाची नक्की दखल घेईल.
हे ‘मुक्तपीठ’ माध्यम जपलं पाहिजे, कारण हे लोकांचं माध्यम आहे, लोकांसाठी मुक्त असणारं ‘मुक्तपीठ’ आहे.
आज मुक्तपिठचा पहिला वर्धापन दिन, या मुक्तपीठचा महावृक्षा होवो। त्यानी कायम जनामनातील आवाज व्हावं, सर्वसामान्य, शोषित वंचितांचा, महिलांचा आवाज व्हावं!
यासह त्यांना मनःपूर्वक सदिच्छा!
(जगदिश ओहोळ (जगदिशब्द) हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते आहेत. संपर्क 9921878801 )