मुक्तपीठ टीम
पीडितेची ओळख उघड न करणे हे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना चक्क कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनी तसे केले आहे. राहुल गांधींसारख्या मोठ्या नेत्यावर त्यांनी चांगल्या उद्देशाने कृत्य केले असूनही पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख उघड केल्याच्या आरोपामुळे सध्या कारवाईची मागणी होत आहे. तरीही याबाबतीतील असंवेदनशीलता कायम असल्याचे दिसत आहे. वर्ध्यातील झडशी परिसरातील विनयभंग झालेल्या एका पीडितेला भर चौकात उभे करत तिच्या समक्ष साक्ष नोंदविला आहे. धक्कादायक बाब अशी की यात दोन महिला पोलिसांचाही समावेश आहे. पीडितेची ओळख चौरचौघात उघड केल्यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त केला जात आहे.
शाळकरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग
- झडशीच्या नजीकच्या एका गावातील अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना एका मुलाने तिला वाटेत अडवून तिचा विनयभंग केला.
- आरोपीने तिला धमकी दिली.
- या प्रकरणी सेलू पोलिसात विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- सध्या हा आरोपी जामिनावर सुटला आहे.
पोलिसांनी कसा मोडला कायदा?
- शुक्रवारी या गुन्ह्याच्या तपासासाठी दोन महिला अधिकारी झडशी येथे पोहोचल्या.
- त्यांनी पीडितेला रस्त्यावर उभे ठेवून तिचे व काही साक्षदारांची साक्ष नोंदविली.
- यावेळी या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत एक पुरुष कर्मचारी उपस्थित होता.
- पीडित मुलगी व तिची आई पोलिसांच्या गाडीमागे धावत असल्याचे यावेळी दिसले.
काही कर्मचारी विनयभंगा सारख्या संवेदनशील प्रकरणात पंचनामा व जबाब नोंदविण्यासाठी झडशी येथे गेले असताना असे असंवेदनशील घटना घडली आहे. त्यावेळी घडलेल्या या प्रकाराची चौकशी करून कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.