मुक्तपीठ टीम
आज देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन. देशभरात ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. पण एक प्रश्न पडतो की जर भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ला तयार होते तर मग प्रजासत्ताक दोन महिन्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी का अस्तित्वात आले?
७१ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी १९५० मध्ये ‘भारत सरकार अधिनियम १९३५’ च्या जागी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. तसे पाहिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान तयार करण्याचे काम २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण केले. त्याला संविधान सभेने मान्यताही दिली. पण २६ जानेवारी १९३० रोजी कॉंग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा नारा दिला होता. त्या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन संविधानाला मान्यता मिळाल्यानंतरही दोन महिन्यानंतरचा मुहूर्त ठरवण्यात आला. २६ जानेवारी १९५० रोजी देशाचे शेवटचे गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी भारतीय प्रजासत्ताकाची घोषणा केली. त्यावेळी डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.
पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात राजेंद्र प्रसाद यांनी २१ तोफाच्या सलामीसह तिरंगा फडकविला आणि भारताला संपूर्ण प्रजासत्ताक घोषित केले. हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांनी व्याख्यान दिले. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो. भारत सरकार अधिनियम १९३५ मध्ये ब्रिटिश भारतात सरकारी धोरण होते. यामध्ये वेगवेगळ्या संस्थानांना अधिकारही देण्यात आले होते.
१८ जुलै १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७ ला ब्रिटिश संसदेकडून रॉयल मान्यता मिळाली. हा कायदा माउंटबेटन योजनेला अंमलात आणण्यासाठी होता, ज्यामध्ये भारताचे दोन तुकडे करून त्यांना आझाद करण्यासाठी होते. या अंतर्गत १४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तानने आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने स्वातंत्र्याची घोषणा केली. त्याच्या एक वर्षापूर्वी म्हणजेच ९ डिसेंबर १९४६ रोजी, भारताची स्वतःची राज्यघटना असण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली. तीन वर्षांच्या बैठकीनंतर घटना स्थापन करण्यात आली आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी विधानसभेने त्याला मंजुरी दिली.