मुक्तपीठ टीम
आयआयटी मुंबईने ईरॉस इन्वेस्टमेंटसह भागीदारीत रणनीतिक सहकार्यातून कुरोसावा, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्वयंचलित पटकथा तयार करणारे साधन विकसित करत असल्याची घोषणा केली आहे. प्रसिद्ध जपानी चित्रपट निर्माते अकिरा कुरोसावा यांच्या नावावरून नामकरण करण्यात आलेले कुरोसावा हा महत्वाचा प्रयत्न आहे, ज्याद्वारे मनोरंजन उद्योगाला एक अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल ज्याद्वारे पूर्ण लांबीच्या चित्रपटांची पटकथा तयार केली जाऊ शकेल. हे सॉफ्टवेअर चित्रपट निर्मात्यांना चित्रपटांची कथा आणि पटकथा विकसित करण्यात मदत करेल. शैक्षणिक आणि संशोधनाच्या दृष्टीने आयआयटी मुंबई कुरोसावावर एक श्वेतपत्रिका देखील तयार करेल.
आयआयटी मुंबई आणि ईरॉस इन्वेस्टमेंट यांच्यात कुरोसावासाठी एक वर्षाहून अधिक सहकार्य करण्यात येत आहे. कुरोसावा योग्य प्रकार, आउटपुट लॉगलाईन आणि सारांश ठरवून लोकप्रिय होण्याची क्षमता असलेली पटकथा तयार करून देईल, ज्यात गरजेनुसार बदल करता येतील. सध्याच्या टप्प्यात कुरोसावा विविध मनोरंजक कथा आणि सीन तयार करू शकतो. उदाहरणार्थ विशिष्ट प्रकारांवर आधारित चित्रपट कथा आणि 2-3 लघु वाक्यांचे प्रॉम्प्ट यात तयार केले जाऊ शकतात. लहान विवरण दिल्यास यात स्टँडर्ड स्क्रीनप्ले प्रकारातील सिन्स यात तयार केले जाऊ शकतात.
आयआयटी मुंबईच्या संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता प्रा मिलिंद अत्रे यांनी सांगितले, “कुरोसावामुळे कथा कथनाच्या कलेत मोठे परिवर्तन घडवण्याची आणि कंटेंट तयार करणाऱ्यांची क्षमता वाढविण्याची मोठी संधी उपलब्ध होईल. आयआयटी मुंबईचे प्रा पुष्पक भट्टाचार्य यांच्या नेतृत्वात ईरॉस इन्वेस्टमेंटसोबत झालेल्या सहकार्याचे आम्ही स्वागत करतो. यामुळे मनोरंजन उद्योगातील पटकथा लेखन स्वयंचलित होणार आहे.”
कुरोसावा हे अत्याधुनिक सखोल शिक्षण आणि नैसर्गिक भाषा विश्लेषण तंत्रज्ञानावर आधारित आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचे जाणकार प्रा पुष्पक भट्टाचार्य यांच्या नेतृत्वात जागतिक कीर्तीच्या संशोधकांचा गट या प्रकल्पावर काम करत आहे. ते आयआयटी मुंबई येथे संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात प्राध्यापक आहेत तसेच राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमीचे फेलो (2015) तसेच अब्दुल कलाम राष्ट्रीय फेलो (2020) आहेत. या प्रकल्पात प्रा भट्टाचार्य यांना आयआयटी मुंबईचे विद्यार्थी मदत करत आहेत.