सुमेधा उपाध्ये
आपल्या आयुष्यात शांतभाव किंवा शांत रस कसा टिकून राहिल यासाठी खास प्रयत्न करण्याची गरज आहे. गरज म्हणते ते यासाठीच की अलीकडे वाढत्या स्पर्धेत माणसांना स्वत:साठी वेळ नाही. सतत काही ना काही मिळवण्यासाठी किंवा भविष्याच्या चिंतेने ते अस्वस्थ असतात. चिंतातूर व्यक्ती कायम मनातून अशांतच असतात त्यामुळे त्यांनी हातात घेतलेले कोणतेही कार्य सहज पूर्ण होत नाही. त्यात अनेक त्रुटी राहतात. त्यामुळे पुन्हा चिडचिड होऊन ते नवीन जबाबदारी घेण्यासही नकार देतात. त्यातून अपयशाचे ते धनी होतात.
मन शांत असेल तर समतोल विचार करण्याची क्षमता निर्माण होते. शांत मनुष्य संकटांवर मात करू शकतो कारण तो कोणत्याही स्थितीत उत्तेजीत होत नाही. म्हणून माणसाने अधिकाधिक शांत राहण्याचा अभ्यास करण्याची गरज असते. कोणतीही गोष्ट मन लावून शिकण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस ध्येय निश्चित प्राप्त होते. मात्र, त्यात सातत्याची गरज आहे. शांत मनुष्यावर सोपवलेली कोणतीही जबाबदारी तो व्यवस्थित विचार करून नियोजन करून सर्व बाजूंचा विचार आधीच करून आयत्यावेळी उद्भवलेल्या कोणत्याही स्थितीस हाताळण्यास सक्षम होतो. त्यामुळे त्याच्या कार्यात यश मिळते. कोणत्याही नव्या गुणाचा विकास आपल्या व्यक्तिमत्वात करत असताना त्या गुणाची कल्पना सतत मनातच करत रहाणे. मी यशस्वी आहे, मी धैर्यवान आहे, मी शांत आहे असं आपण स्वत:लाच वारंवार समजावले की त्याचा परिणाम आपल्या सूक्ष्म मनावर निश्चित होऊ लागतो. आपले काय चुकतेय हे कळते. व्यक्त होण्यापूर्वी आपण परिस्थितीचे अवलोकन काही क्षण करतो आणि नंतर प्रतिक्रिया देतो त्यामुळे आपले संबंधही सुधारू लागतात. आपल्यासाठी सहाय्यभूत ठरतील अशी माणसं आपल्याशी मैत्री करू लागतात.
शांत आणि संयमी व्यक्तिमत्वाची प्रतिमा आपल्यात निर्माण व्हावी यासाठी सुरूवातीला नियमित अभ्यास करावा लागतो. अतिशय उच्चतम म्हणजे संत महात्म्यांची चरित्र वाचली पाहिजेत . ते कोणत्या परिस्थितीत कसा विचार करीत होते हे आपण जाणून घेतले पाहिजे. अशाच उच्चतम कोटीतल्या शांत सुस्वभावी संतमहात्मे म्हणा किंवा देवाची सुंदर सुहास्य प्रतिमा असेल तर कल्पना तशीच करीत त्याकडे काही वेळ पहात रहावे. त्यांचा शांत भाव आपल्यात उतरत आहे हा भाव ठेवावा.
शांतभाव हा आपल्याला अनेक क्लेशकारक घटनांपासून दूर ठेवतो. समाधानाची वाढ होते. रागावर विजय मिळवू शकलो तर कित्तेक विनाशक प्रसंग टाळता येतात. रागामुळे आणि चिंतेमुळे आपण आपले नुकसान करीत असतो. संसारात अनेक प्रसंग अगदी कठिण परीक्षा पाहणारे असतात. पण यावेळी शांत राहून हवे तर मनात आपल्या ईष्ट देवाचे किंवा कोणत्याही आपल्या श्रद्धेयस्थानाचे स्मरण करावे म्हणजे ते कठिण क्षण सरतात नंतर त्यावर सुयोग्य विचार करून प्रतिक्रिया देण्यास आपण सज्ज होतो. आपला अभ्यास पक्का होत गेला की आपले म्हणणे शांतपणे समोरच्या माणसाला कसे पटवून देता येईल ही खुबी आपल्याला सहज साध्य होते. यातून आपण अनेक कठिणातील कठिण कार्य लीलया पार पाडतो. एक यशस्वी व्यक्ती म्हणून आपली ओळख होऊ शकते.
मी सतत शांत आणि प्रसन्न रहात असतो. माझ्या मनातल्या शांत सरोवरात मी एखाद्या राजहंसा प्रमाणे विहार करीत आहे. कोणतीही बाह्य परिस्थिती माझी मन:शांती ढासळू शकत नाही असा विचार दृढ करीत जावे. मग असा अनुभव येतो की मनातल्या शांत सरोवरातील ही शांती आपल्या मागे पुढे एवढेच नव्हे तर अंतरबाह्य चोहिकडे पसरलेली आहे. हा शांत रस आपल्यात सतत घुमत राहतोय. ही धारणा पक्की झाली की पहा कसा फरक पडतो ते. यामुळे आपण प्रत्येक कार्य सुनियोजित करतो. तयारी पक्की असेल तर घाबरण्याचे कारणच रहात नाही. जसे अभ्यास पूर्ण झालेला असेल तर आपल्याला शैक्षणिक परीक्षेची कधीच भीती वाटत नाही. तेच या जगाच्या क्षणोक्षणीच्या परीक्षेचे आहे. या शांतभावानेच आपले एक एक कार्य यशस्वी होत जाते. आलेल्या कोणत्याही स्थितीचा सामना आपण करू शकतो, त्यासाठी आवश्यक असलेला धीटपणा सहाय्यास येतो. आत्मविश्वास वाढतो आणि कार्य सफल होते. मात्र, हे यश प्राप्त करताना दिवसरात्र आपल्या आतली शांतता कायम टिकून रहावी यासाठी तसाच विचार करणे आणि हा शांत रस सतत प्राशन करत राहिलो तर कोणत्याही कारणाने यश आपल्याला हुलकावणी देऊ शकत नाही.
(सुमेधा उपाध्ये या पत्रकारितेतील दीर्घ अनुभवानंतर आता सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)
Khup chan
Dhanyawad
I am powerful
I am peacful