हेरंब कुलकर्णी
बुधवारी एकनाथ आवाड यांचा जन्मदिवस होता. एन डी पाटील सर दोन दिवसापूर्वी गेले आणि सिंधुताई सपकाळ त्यापूर्वी काही दिवस अगोदर… मी सोशल मीडियाचा कानोसा घेतो आहे. या तिघांच्या बाबत भावनांची तीव्रता नेमकी कशी आहे ? त्या तिघांच्या कर्तुत्वाचा तुलना करण्याचा हेतू नाही किंबहुना ती करणे मूर्खपणा ठरेल पण यातून एक वेगळा मुद्दा मला मांडायचा आहे. त्यासाठी ही तीन नावे निवडली आहेत.
सिंधुताई गेल्यानंतर मी लगेच अनेकांचे स्टेटस बघितले तर दहा पैकी सहा स्टेटस तरी सिंधुताईंच्या फोटोचे होते. नंतर सोशल मीडियाच्या पोस्ट मध्ये ही तेच दिसले. एन. डी. पाटील सर गेले तेव्हाही मी स्टेटस बघितले ते प्रमाण होते पण तुलनेत कमी होते आणि दोन्ही मध्ये फरक हा की पाटील सर यांचे स्टेटस ठेवणारे लोक हे सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे, वेगळा विचार मांडणारे समाजिक कामाशी जोडले असणारे व ओळखीचे चेहरे होते पण सिंधुताईंच्या पोस्ट फॉरवर्ड करणारे स्टेटस ठेवणारे हे त्या अर्थाने विचार वर्तुळातील नव्हते तर व मध्यमवर्गातील संख्या विशेष होती. या दोघांच्या तुलनेत बुधवारी एकनाथ आवाड यांचा जन्मदिवस तर अजिबात परिचित नाही किंबहुना कोण हे एकनाथ आवाड ? असे अनेक जण नक्कीच प्रश्न विचारू शकतील….विशेषतः शहरी भागातून.
मला ही चर्चा सामाजिक काम म्हणजे काय या प्रश्नाकडे न्यावीशी वाटते. आपल्याकडे सामाजिक काम याविषयी व्याख्या आणि स्पष्टता येणे गरजेचे आहे असेच वाटत राहते. सेवाकार्य आणि संघर्ष असे सामाजिक कामाचे दोन पैलू आहेत. सामाजिक व्यवस्थेचे जे बळी आहेत अशा महिला मुले वृद्ध यांना मदत करणे अशा प्रकारचे जे काम केले जाते. त्या प्रकारच्या कामाला समाजात विशेष मान्यता आहे. मध्यमवर्ग, सर्वसामान्य लोक त्या कामात उस्फूर्तपणे मदत करतात.त्या महिला, वृद्ध, आजारी व्यक्ती यांच्या समोर दिसणाऱ्या दुःखाने त्यांच्यातील करुणा जागी होते. त्यात सर्वच धर्मांनी अशा प्रकारच्या सेवेला पुण्याची जागा दिलेली असल्यामुळे या कामाचे मोल वाढते. मदर तेरेसा बाबा आमटे यांच्या या बाबतीत केलेल्या कामाचे महत्त्व अधोरेखित झाल्यामुळे या कामाला समाजाचा खूप पाठिंबा मिळतो. सिंधुताई विषयीच्या या लोकप्रियतेचे कारण या पाठिंब्यात आहे.त्यांची करुणा समाजाची करुणा बनते.त्यांनी आधार दिलेली १४०० लेकरं समोर बघायला मिळतात. त्यातून त्यांचे दुःख हे समाजाचे बनते व बघता बघता समाज त्या प्रश्नाशी जोडला जातो..
पण संघर्ष करणारे कार्यकर्ते हे त्यांच्या कामातून हजारो-लाखो कुटुंबाचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या कामाच्या प्रभावाची तीव्रता कितीतरी मोठी असते परंतु ती प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे किंवा त्या लोकांच्या जगण्याचे प्रश्न नीटपणे यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे ते लोक यांच्या भावविश्वाचा भाग नसल्यामुळे असेल संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याची काम हे सामाजिक काम मानले जात नाही. सेवाकार्य करणारे गरिबांच्या हातात भाकरी देतात आणि संघर्ष करणारे या गरिबांना त्यांची स्वतःची भाकरी का मिळत नाही या प्रश्नावर संघर्ष करतात. एन डी पाटील यांनी आयुष्यभर संघर्ष केला.त्या संघर्षातून हजारो शेतकरी, शेतमजूर यांचे जीवनमान उंचावले. एन्रॉन सारखा प्रकल्प रद्द केल्यामुळे राज्याचे हजारो कोटी रुपये वाचले त्यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रातील शिक्षण आरोग्य परिवहन रेशन यासारख्या सुविधा अधिक प्रभावीपणे गरिबांपर्यंत पोहोचल्या. अनेक कष्टकऱ्यांना त्यांच्यामुळे न्याय मिळाला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामातून शोषण कमी कमी होत गेले. त्यांचे काम हे थेट व्यवस्थेवर परिणाम करत होते. राजकारणाचा एकूणच दर्जा उंचावत होते. वाईट प्रवृत्तींना जागेवर थांबवत होते पण त्याची आकडेवारी त्यांनी उभ्या केलेल्या कुटुंबांचे चेहरे या प्रकारे थेट समोर येत नसल्याने किंवा अशा कामाला सामाजिक काम म्हणण्याची पद्धत नसल्याने त्यांचे मूल्य कितीतरी मोठे असते पण ते ज्या विषयांवर काम करतात;तो विषयच मध्यमवर्गाला जवळचा वाटत नसल्यामुळे नकळत त्याने मध्यमवर्ग फार भारावून जात नाही. तो फार तर एन डी पाटील यांचा प्रामाणिकपणा,आयुष्यातील सातत्य,साधेपणा,वक्तृत्व,व्यासंग, नैतिकता रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेचे चेअरमन असणे महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव अशा गोष्टींनी प्रभावित होऊ शकतो परंतु शेतकरी कामगार पक्षाचा त्यांचा अजेंडा व त्यासाठी त्यांनी केलेले काम हे मात्र मध्यमवर्गाला कदाचित प्रभावित करत नसेल..
एकनाथ आवाड यांची गोष्ट तर अधिकच न्यारी. एकनाथ आवाड दुर्लक्षित मराठवाड्यातील बीड सारख्या मागास जिल्ह्यातले,त्यातही दलित कुटुंबांसोबत काम करत राहिले. त्यावेळच्या तीव्र जातीय विषमता असलेल्या मराठवाड्यात एकनाथ आवाड यांनी केलेले संघर्ष अंगावर काटा आणणारे आहेत. त्यातही पारधी-भिल्ल आदिवासी दलित भटके-विमुक्त यांना त्यांनी गायरानाच्या जमिनीवर शेती करायला प्रोत्साहन दिले. त्या जमिनीवर अतिक्रमण करून त्या जमिनी ताब्यात घेतल्या. संघर्ष करून त्या जमिनी नावावर करून घेतल्या व त्यातून अक्षरशः हजारो कुटुंब आज स्थिरावले आहेत. मी आष्टी तालुक्यात एका भटक्या-विमुक्तांच्या अशाच वस्तीवर दारात शेतातील धान्य वाळत घालताना बघितले तेव्हा अंगावर काटा आला होता.भाकरी मागून खाणारे ते भटके आज आत्मसन्मानाने स्वतःच्या शेतातील धान्य खात होते.
एकनाथ आवाड यांच्या प्रयत्नाने हजारो कुटुंबे आज स्थिरावली आहेत.हजारो दलितांना आत्मसन्मानाने जगायला त्यांनी प्रेरणा दिली.याची कुठे नोंद आहे ? एकनाथ आवाड यांचे काम पुण्या-मुंबईच्या जवळ नसल्यामुळे ते कुठेच नीट पोहोचले नाही.शहरी भागात केलेले काम लवकर पोहोचते. अगोदरच मराठवाडा दुर्लक्षित त्यातला बीड जिल्हा त्यात दलितांमध्ये काम करणारा माणूस त्याची कोण कशाला नोंद घेईल ? पण दलित भटके आदिवासी यांना संघटीत करून त्यांना उदरनिर्वाहाची साधने आवाडांनी मिळवून दिली. पण आज त्याची राज्यस्तरावर कुठेच प्रभावी नोंद झाली नाही. महाराष्ट्र भाषण द्यावे अशा तोडीचे हे काम या माणसाने केले आहे पण त्याला आपण सामाजिक कामही मानत नाही…
या तीन उदाहरणातून माझा मुद्दा पोहोचला असेल… मुलांसाठी महिलांसाठी जे सेवाकार्य केले जाते त्याला मी अजिबात कमी लेखत नाही समाजातील या नाकारलेल्या वर्गात साठी कुणीतरी काम करायलाच हवे ते हे लोक करतात ही कौतुकास्पद गोष्ट आहे.मी आणि अनेकजण सदैव अशा व्यक्तींचे कौतुक करतो प्रोत्साहन देतो. समाजाचा त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत निधी मिळतो मान्यता मिळते पण तोच समाज संघर्ष करणाऱ्यांना मात्र मदत करत नाही त्या कामाला सामाजिक काम मानत नाही ही खरी तक्रार आहे आणि म्हणून सेवेच्या कामाला समाज जितकी मदत करतो तितकीच मदत आणि मान्यता त्याने संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना ही दिली पाहिजे किंबहुना संघर्ष करणारे कार्यकर्ते गरिबांचे जीवनमान पूर्णपणे बदलून टाकण्यात यशस्वी होतात.ती संख्या काही हजारात असते आणि त्या सुधारणा व्यवस्थात्मक असल्यामुळे तिथून पुढच्या गरिबांनाही दिशा मिळत असते. वन हक्क कायदा २००६ सली आला. तो कायदा येण्यासाठी गावोगावच्या हजारो कार्यकर्त्यांनी संघर्ष केला होता आणि त्या कायद्यामध्ये जंगलात जमीन कसणाऱ्या आदिवासींना सर्व जमीन त्यांच्या नावावर मिळाली. या एका कायद्याने लाखो आदिवासींचे जगणे बदलून जाऊ शकते. मेधा पाटकर यांच्या आंदोलनातून २४५ बुडालेल्या गावातील हजारो कुटुंबांचे पुनर्वसन होऊ शकले. या हजारो कुटुंब बहिणीच्या रस्ताला आपण सामाजिक काम म्हणणार की नाही तेव्हा व्यवस्थात्मक संघर्षातून होणारी समाज सेवा ही अधिक व्यापक असते आणि म्हणून सेवा कार्याचे मोल किंचितही कमी न लेखता या संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजाने मदत करायला हवी. पण ‘दारिद्र्याची शोधयात्रा’ या अहवालाच्या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना भेटलो. तेव्हा अतिशय विदारक स्थितीत ही सर्व आंदोलने सुरू आहेत. या कार्यकर्त्यांनाची आणि आंदोलनांची स्थिती अतिशय वाईट होती.नेमलेल्या कार्यकर्त्यांना साधे मानधने देणे मुश्किल होते. सामाजिक कृतज्ञता निधीतून काही कार्यकर्त्यांना मानधन सुरू होते.अवघे २००० ते ५००० मानधनावर अनेक ठिकाणी कार्यकर्ते काम करत होते. मोर्चा काढायचा तरी खर्च करायला पैसे नसायचे.गाडी असणे तर दूरच.. प्रत्यक्ष हजारो कुटुंबांना करण्याची क्षमता असणाऱ्या या आंदोलनांना समाज मदत का करत नाही ? असा प्रश्न माझ्या मनात आला. तेव्हा हे उत्तर मिळाले…
अर्थात त्यात आंदोलनांच्याकडेही एक छोटा दोष जातो की ते जे काम करतात ते वेगवेगळी माध्यमे वापरून मध्यमवर्गपर्यंत ती पोहोचवायला हवेत.आज आयटी क्षेत्र व मध्यम वर्गातील अनेक जण सामाजिक मदत करावी अशा मनाचे आहेत पण त्यांच्यापर्यंत सेवाकार्य जितके पटकन पोहोचते तितके आंदोलकांचे काम पोचत नाही व आंदोलक नेमके समाजाच्या प्रश्नांना कसे भिडतात गरिबांचे जगणे कसे बदलते. हे तपशीलवार त्यांच्यापर्यंत जर पोहोचले तर ते नक्कीच मदत करतील.त्यासाठी मध्यम वर्गात या आंदोलनाची वेगवेगळ्या प्रकारे माहिती पोहोचवून देऊन निधी संकलन करणारे कार्यकर्ते निर्माण व्हायला हवेत. तर मध्यम वर्ग आणि कार्यकर्ते यांना जोडणारे पूल आता निर्माण व्हायला हवेत म्हणून समाजात सेवाकार्य करणे हेही महत्त्वाचे आहे व आंदोलक ही महत्त्वाची आहेत आणि दोघांनाही सारखीच मान्यता मिळायला हवी आणि सारखाच समाजाचा हात मिळायला हवा यासाठी हे आज लिहिलंय.