मुक्तपीठ टीम
राज्यातील नोंदीत सुरक्षा रक्षकांच्या विविध संघटनांसमवेत आज ग्रामविकास, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नोंदीत कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऐकून घेतल्या व या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश कामगार विभागास दिले.
या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कामगार सहआयुक्त शिरीन लोखंडे, कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा व इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदीत व कार्यरत सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह निधी जमा करण्याबाबत आयुक्त स्तरावर एक समिती गठीत करावी, अशा सूचना हसन मुश्रीफ यांनी यावेळी केल्या.
सुरक्षा रक्षकांना उच्च प्रतीचा गणवेश देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व सुरक्षा रक्षकांचा गणवेश एकसमान, एकरंगी आणि दर्जेदार असावा आणि त्याकरिता हा विषय सल्लागार समितीसमोर मांडण्याची सूचनाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केली.
या बैठकीत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबियांना कल्याणकारी योजना लागू करणे, सुरक्षा रक्षकांच्या वेतनवाढीवर निर्णय घेणे, सल्लागार समितीवर अनुभवी उच्चशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे, सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया, मंडळातील निरीक्षकांच्या बदल्या, मंडळातील वेटिंग लिस्ट संपुष्टात आणण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.