सुप्रिया विश्वास
डॉ. कमल रणदिवे यांच्या १०४ व्या वाढदिवसानिमित्त गुगलने डूडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यामुळे त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. कर्करोगावरील विशेष संशोधन कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बायोमेडिकल संशोधक डॉ कमल रणदिवे यांचं जीवन हे आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहे. डॉ. कमल रणदिवे या गेल्या शतकावर ठसा उमटवणाऱ्या आद्य जैव वैज्ञानिक आहेत.
डॉ. कमल रणदिवे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१७ रोजी आपल्या पुण्यात झाला. त्या भारतीय बायोमेडिकल संशोधक होत्या. त्यांनी कर्करोग आणि विषाणू यांच्यातील संबंधांवर संशोधन केले. त्या भारतीय महिला वैज्ञानिक संघटनेच्या (IWSA) संस्थापक सदस्य होत्या. विज्ञान आणि शिक्षणात समानता आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठीही त्या ओळखले जातात.
डॉ. कमल रणदिवे: पुण्यात शिक्षण, ग्लोबल झेप!
- डॉ. कमल रणदिवे यांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा येथील मुलींच्या शाळेत येथे झाले. त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी दहावीनंतर वैद्यकशास्त्र शिकावे.
- त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्रात बीएससीचे पदवी शिक्षण घेतले.
- १९६०च्या दशकात त्यांनी मुंबईतील भारतीय कर्करोग संशोधन केंद्रात भारतातील पहिली टिश्यू कल्चर संशोधन प्रयोगशाळा स्थापन केली.
- त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठीच्या संशोधनासाठी त्यांना १९८२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर (ICRC) मध्ये संशोधक म्हणून काम करत असताना १९४९ मध्ये त्यांनी पेशीविज्ञान, पेशींचा अभ्यास या विषयात डॉक्टरेट मिळवली. बॉल्टिमोर, मेरीलँड, यूएसए येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील फेलोशिपनंतर, त्या मुंबईतील ICRCमध्ये परतल्या. या काळात त्यांनी वैद्यक क्षेत्रात मोठी कामगिरी बजावली. ११ एप्रिल २००१ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.