मुक्तपीठ टीम
जीआय अर्थात भौगोलिक निर्देशक म्हणून प्रमाणित असणाऱ्या उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन दिले जाते. त्या धोरणानुसार आपल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चिकू ‘डहाणू-घोलवड सपोटा’ इंग्लंडला पाठवण्यात आले आहेत.
घोलवड सपोटाचे जीआय प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाकडे असून, अनोखी मधुर चव ही या फळाची विशेष ओळख आहे. घोलवड गावातील कॅल्शिअम समृद्ध मृदेमुळे चिकूला ही चव येत असल्याचे मानले जाते.
सध्या पालघर जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्र चिकू लागवडीखाली आहे. चिकू पिकवणाऱ्या ५ हजार शेतकऱ्यांपैकी १४७ शेतकरी अधिकृत जीआय प्रमाणपत्र वापरून पीक घेतात.
अधिकृत जीआय वापरकर्त्यांनी पिकवलेल्या डहाणू-घोलवड सपोटा चिकूचे अपेडा (शेतकी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण) मार्फत सहाय्यित आणि नोंदणीकृत वेष्टन सुविधा असलेल्या- मेसर्स के बी (Kay Bee) ऍग्रो इंटरनॅशनल प्रा.लि., तापी (गुजरात)’ येथे वर्गीकरण व श्रेणीकरण करुन निर्यात करण्यात आली.
सध्या, आयातदार देशांमध्ये मुख्यत्वे विशिष्ट वांशिक आणि सांस्कृतिक गटांकडूनच मागणी आहे. “मुख्य प्रवाहातील ग्राहकांवर लक्ष केंद्रित केल्यास निर्यातीत अनेक पटींनी वाढ होऊ शकते. चिकूची इतर फळांसारखा एखादाच विशिष्ट हंगाम असण्याची गरज नसून चिकूचे उत्पादन वर्षभर होऊ शकते, याचा उपयोग निर्यातवाढीसाठी करून घेता येईल”, असे मत अपेडाचे अध्यक्ष- डॉ.एम.अंगामुथू यांनी मांडले आहे.
जीआय उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यावर अपेडाचा भर असतो. जीआय उत्पादने वैशिष्ट्यपूर्ण असून, त्यांच्यातील आंतरिक गुणांमुळे त्यांना खरोखरच बाहेरच्या कोणत्याही ठिकाणहून स्पर्धा उत्पन्न होण्याची शक्यता नसते. परिणामी, निर्यातीसाठी ती उत्पादने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात.
चिकू आहे सदाबहार!
• चिकूचे उत्पादन कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये होते.
• कर्नाटकात सर्वाधिक उत्पादन होत असून, त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
• त्याचा उपयोग फ्रुटसॅलडची रंगत वाढविण्यासाठी होतो.
• दूध किंवा योगर्टमध्ये मिसळून त्याचे सेवन करता येते.
• चिकूपासून चविष्ट स्मूदी करता येते.
• चिकूवर प्रक्रिया करून त्यापासून मोरांबाही तयार करता येतो.
पाहा व्हिडीओ: