मुक्तपीठ टीम
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाले तर हक्काचं योग्य वेतन वेळेवर मिळेल या अपेक्षेनं कर्मचारी लढत आहेत. मात्र, त्याचवेळी सरकारची भूमिका कमालीची ताठर आहे. निलंबनाचा वरंवटा फिरत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरत आहे. पालघरमध्ये एका कर्मचाऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला, तर कोल्हापूरात एका कर्मचाऱ्याचा ह्रदयविकारानं मृत्यू ओढवला. हा मृत्यू कारवाईच्या भीतीने झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. संप मिटवण्यासाठी सरकारने संवेदनशीलता दाखवत पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. केवळ भाजपा नेते माध्यमांशी बोलत असल्याने संप त्यांचा आहे, असं सरकारने समजून कर्मचाऱ्यांवर राग काढू नये असे मतही कर्मचारी व्यक्त करत आहेत.
पालघरमधील एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
- राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.
- कर्मचारी संपावर असल्यामुळे बसफेऱ्या बंद आहेत.
- राज्यभर आंदोलन सुरु असताना पालघर जिल्ह्यातील जव्हार बस डेपोतील दीपक खोरगडे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
- सध्या कमी पगार आहे.
- तसेच पगारात वाढ होत नसल्यामुळे मानसिक स्थिती ढासल्यामुळे खोरगडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
- त्यांच्यावर जव्हार कुटीर रूग्णालयात उपचार सुरु होते.
- प्रकृती नाजुक असल्यामुळे आता त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे.
कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याचा हृदय विकाराने मृत्यू, नातेवाईकांचा आरोप
- कोल्हापूरातील एसटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ पसरली आहे.
- अनिल मारुती कांबळे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
- ते २०१५ साली कामावर रुजू झाले होते.
- गारगोटी जवळील मडीलगे खुर्द गावचे रहिवासी आहेत.
- सध्या सावंतवाडी आगार चालक कम वाहक म्हणून काम करत होते
- संप असल्याने ते मडीलगे येथे राहायला होते.
- गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.