मुक्तपीठ टीम
शेतकरी आंदोलनाच्या ४३ व्या दिवशी गुरुवारी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चे काढले. सिंघूपासून टिकरी सीमा, टिकरी ते कुंडली, गाजीपूरपासून पलवल, रेवासनपासून पलवल असे मोर्चे निघाले. शेतकरी नेत्यांनी ट्रॅक्टर मोर्चांमध्ये ६० हजार ट्रॅक्टर सहभागी झाल्याचा दावा केला. आजचे मोर्चे हे फक्त एक झलक होती, जर मागण्या मान्य नाही झाल्या तर २६ जानेवारीला दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढली जाईल, असा इशाराही दिला आहे.
शुक्रवारी शेतकरी आणि सरकारमध्ये ९व्यांदा चर्चा होईल. या चर्चेतून मार्ग निघण्याची अपेक्षा आहे. शुक्रवारच्या बैठकीत जर तोडगा निघाला नाही तर २६ जानेवारीला हे आंदोलन चिघळण्याचा गंभीर इशारा केंद्र सरकारला शेतकरी नेत्यांनी दिला आहे. आजचा मोर्चा हा त्याचा ट्रेलर असेल, असा दावा त्या आंदोलकांनी केला आहे.
हरियाणा मधील शेतकरी संघटनांनी २६ जानेवारी रोजी प्रत्येक गावातून १० महिलांना दिल्ली येथे बोलावले आहे. हेच आवाहन उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांनी देखील केले आहे. प्रजासत्ताक दिनी महिला ट्रॅक्टर मार्चाचे नेतृत्व करतील. हरियाणामधील सुमारे २५० महिला ट्रॅक्टर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेत आहेत.
८ जानेवारी रोजी शेतकरी आणि सरकारची बैठक
सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या ८ फेऱ्या झाल्या आहेत. पण अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. आता सर्वांचं लक्ष ८ जानेवारीच्या बैठकीकडे लागलं आहे. तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. सरकारने अनेकदा एमएसपी कायम ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे. पण शेतकऱ्यांना एमएसपीवर लेखी हमी हवी आहे.