मुक्तपीठ टीम
मुंबईतील प्रसिद्ध माउंट मेरी जत्रा सुरु झाली आहे. १८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या जत्रेला शंभर वर्षांपेक्षा मोठी परंपरा आहे. कोरोना संकटात थांबलेली ही परंपरा आता पुन्हा दणक्यात साजरी होतेय. मुंबईतूनच नाही तर आसपासच्या परिसरातूनही लाखोंच्या संख्येनं श्रद्धाळू या जत्रेला भेट देतात. परिसरातील वांद्रे महोत्सव म्हणजेच Bandra Fest अनुभवतात. गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्रात या जत्रेची खास बातमी सादर करतेय मी अपेक्षा सकपाळ.
वांद्रे पश्चिम परिसरात वसलेल्या ‘बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट’ हे जुने चर्च आहे. या चर्चलाच माउंट मेरी चर्च म्हणूनही ओळखले जाते. मुंबईतील जुन्या चर्चेपैकी एक असणाऱ्या या चर्चची वास्तू रचनाही वास्तूची आवड असणाऱ्या अभ्यासकांनाही आकर्षित करते. हे चर्च खूप मोठे आहे. खास बाब म्हणजे आजही ते तसेच जतन करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्य पर्यटकांसाठी ते आकर्षणाचे केंद्र आहेच, पण अभ्यासकांनाही तिथं आल्यावर जुन्या काळातील वास्तूंचे चांगल्या अवस्थेतील दर्शन घेत अभ्यास करता येतो.
चर्चमधील मदर मेरी मनोकामना पूर्ण करते अशी अनेकांची श्रद्धा असते. तेथे मेणाने बनवलेले शारीरिक अवयव अर्पण करण्याची परंपरा आहे. दर वर्षी सप्टेंबर महिन्यात माऊंट मेरी जत्रा भरते. चर्चच्या परिसरात साजऱ्या होणाऱ्या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी श्रद्धाळूंप्रमाणे इतरही लोक येतात.
या चर्चचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते समुद्रसपाटीपासून ८० मीटर उंचीवर वसलेले आहे. या चर्चच्या परिसरातून मुंबई शेजारील अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहता येते. हे चर्च जेथे आहे तो वांद्रे पश्चिम परिसर मुंबईच्या पॉश भागांपैकी एक आहे. तसेच त्यापासून काही अंतरावरच बँडस्टँड आणि कार्टर रोड अशी विविध प्रेक्षणीय स्थळंही आहेत. चित्रपट अभिनेत शाहरुख खान, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर अशा सेलिब्रिटींची घरं देखील वांद्रे समुद्र किनाऱ्याचा परिसराला एक वेगळं ग्लॅमर आहे. तसेच स्ट्रिट शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेली लिंकिंग रोडची फॅशन मार्केटही याच भागात आहे. वांद्रे येथील नॅशनल लायब्ररी ही जुनी संस्था, वांद्रे तलाव आणि खवैयांसाठी हिल रोड भागात अनेक फुड जॉइंट्स आहेतच. वांद्रे तलावाच्या रेल्वे स्थानकाजवळील भागात असलेले खूप जुने होम मेड आइस्क्रिम आणि फालुद्याचे दुकान तर न चुकवावे असेच!
आणि हो घरी परताना तुम्ही लोकल ट्रेनने जाणार असाल तर चांगलंच पण जर रस्त्याने जाणार असाल तरीही या फालुद्याचा आस्वाद घेतल्यानंतर वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकालाही भेट द्या. कारण हे रेल्वे स्थानकही एक हेरिटेजच आहे. जतन केल्यानंतर प्रेक्षणीय ठरलेलं. तर मग वाट कसली पाहाताय…चला तर वांद्र्याला…माऊंट मेरी जत्रेला!
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे जत्रेसाठी केलेली व्यवस्था
- परिसरातील रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती
- भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे करावी यासाठी स्वच्छतेची खास व्यवस्था
- गर्दी लक्षात घेत फिरत्या शौचालयांची व्यवस्था
- प्रथमोपचार आणि वैद्यकीय सुविधा
- शंभरपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे
- देखरेख कक्ष आणि निरीक्षण मनोरा
- २४ तास नियंत्रण कक्ष