मुक्तपीठ टीम
फेसबुक आता फक्त वाढदिवस साजरा करणं, श्रद्धांजली वाहणं आणि विचार मांडणं यासाठीचं सोशल मीडिया माध्यम राहिलेलं नाही. आता जगाशी जोडणारं हे समाजमाध्यम आता देशातील छोट्या व्यावसायिकांना मोठे बनवण्यासाठी कर्ज देण्याचंही माध्यम बनलं आहे. फेसबुकने कर्ज पुरवठ्यासाठी इंडिफी या पतपुरवठा कंपनीसोबत भागीदारी केली आहे. देशातील छोट्या व्यावसायिकांना ५० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्जाचे पैसे खात्यात पाच दिवसात येतील. थोडक्यात समाजमाध्यमाच्या माध्यमातून आता आपल्याला व्यावसायिक वाढीसाठी भांडवलही मिळणार आहे.
ज्यामुळे आपण सहजपणे कोणत्याही संधीचा लाभ घेऊ शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. यामध्ये कर्जावरील व्याज सूट देखील मिळेल.
कर्ज क्षेत्रात फेसबुकचे पहिले पाऊल
- सोशल मीडिया क्षेत्रावर सत्ता गाजवल्यानंतर फेसबुकला आता कर्ज क्षेत्रातही वर्चस्व गाजवायचे आहे.
- यासाठी कंपनीने भारतासाठी प्रथमच ‘लघु व्यवसाय कर्ज उपक्रम’ योजना जाहीर केली आहे.
- यापूर्वी फेसबुकने अशी योजना जगातील इतर कोणत्याही देशात सुरू केलेली नाही.
- या योजनेसाठी फेसबुकने वित्तीय कंपनी इंडिफीसोबत भागीदारी केली आहे.
- इंडिफीद्वारे हे कर्ज दिले जाईल, पण फेसबुक देखील यात आपली भूमिका बजावेल.
पन्नास लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध मिळणार
- फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेच्या माध्यमातून कंपनी लहान व्यवसायांना भांडवल पुरवते.
- तसेच, या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी, छोट्या व्यापाऱ्यांना प्रथम त्यांच्या व्यवसायाची जाहिरात फेसबुकमध्ये करावी लागेल.
- यानंतर, ते ५ लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतील. या कर्जावर १७ ते २० टक्के दराने व्याज आकारले जाईल.
- या कर्जासाठी अर्ज करणाऱ्या लोकांकडून इंडिफाई कर्जाच्या अर्जावर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारणार नाही. ५ दिवसात कर्ज उपलब्ध होईल.
- अजित मोहन यांच्या मते, इंडिफी अर्जदाराला सर्व आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर ५ दिवसांच्या आत कर्ज मिळेल.
- महिला व्यावसायिकांना व्याजदरात ०.२ टक्के सूट मिळेल.
- सध्या ही योजना देशातील २०० शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
- कर्जाची संपूर्ण रक्कम इंडिफी देईल आणि व्यावसायिकांनाही कर्जाची रक्कम इंडिफीलाच द्यावी लागेल.