मुक्तपीठ टीम
महामारीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींच्या घरात परिस्थिती विकट झाली. परंतु, आता देशात रोजगाराची स्थिती सुधारत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओच्या नुकत्याच केलेल्या वेतनश्रेणीच्या आकडेवारीवरून हे सूचित होते. कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जूनमध्ये १२ लाख ८३ हजार सदस्य होते. मेच्या तुलनेत जूनमध्ये सदस्यांची संख्या ५ लाख ९ हजारांनी वाढली आहे. त्याचाच अर्थ रोजगार वाढला असा मांडला जात आहे.
देशातील रोजगार संधीत वाढ
- जूनमध्ये जोडलेल्या एकूण १२ लाख ८३ हजार ग्राहकांपैकी ८ लाख ११ हजार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या सामाजिक सुरक्षा कव्हरेज अंतर्गत प्रथमच आले आहेत.
- तसेच ४ लाख ७३ हजार ग्राहक ईपीएफओ कव्हर केलेल्या आस्थापनांमध्ये नोकरी बदलून ईपीएफओमधून बाहेर पडले. परंतु पुन्हा ईपीएफओमध्ये सामील झाले.
- बहुतेक सदस्यांनी त्यांचा भविष्य निर्वाह निधी(पीएफ)ची रक्कम काढण्यासाठी अर्ज करण्याऐवजी पूर्वीच्या नोकरीतून चालू पीएफ खात्यात पैसे हस्तांतरित करून ईपीएफओमध्ये त्यांचे सदस्यत्व सुरू ठेवणे पसंत केले.
ईपीएफओ ही देशाची प्रमुख संस्था आहे. जी ईपीएफ आणि एमपी अधिनियम, १९५२ च्या कायद्यानुसार समाविष्ट असलेल्या संघटित / अर्ध-संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा लाभ प्रदान करण्याची जबाबदारी आहे.