मुक्तपीठ टीम
स्त्री भ्रूणहत्येच्या घटनांना अटकाव बसावा म्हणून पुण्यातील हडपसर मॅटर्निटी मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात मुलगी झाल्यास संपूर्ण प्रसूतीचे पैसे माफ केले जातात. आतापर्यंत या रुग्णालयात २ हजार ४००हून अधिक मुलींची मोफत प्रसूती झाली आहे. यासाठी त्यांनी गर्भवतीच्या कुटुंबीयांकडून एक पैसाही घेतला नसल्याचा दावा रुग्णालयातील डॉ. गणेश राख यांनी केला आहे. पुण्यातील हे रुग्णालय ‘मुलगी वाचवा मोहिमे’चे जिवंत उदाहरण ठरले आहे.
मॅटर्निटी मल्टीस्पेशालिटी रूग्णालयात १० वर्षांपासून सुरू आहे ‘हा’ उपक्रम
- डॉ.गणेश राख सांगतात की, स्त्री भ्रूण हत्येविरोधातील आमचा हा उपक्रम २०१२ मध्ये सुरू झाला.
- यानंतर अनेक राज्ये आणि आफ्रिकन देश त्यात सामील झाले.
- जर एखाद्या कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिथे संपूर्ण वैद्यकीय शुल्क माफ होतो.
- या सकारात्मक उपक्रमाचा परिणाम म्हणून आजूबाजूच्या परिसरात स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांमध्ये घट झाल्याचे ते सांगतात.
डॉ.गणेश सांगतात की, “रूग्णालयामध्ये सुरुवातीच्या काळात जेव्हा कधी कोणाच्या तरी पोटी मुलगी झाली, तेव्हा घरातील लोक तिला भेटायलाही आले नाहीत. मुलगी असताना रूग्णालयाची फी भरण्यासही त्याने नकार दिला होता. त्याच वेळी मुलगा झाला की तो सर्व काही आनंदाने करत असे. अशा परिस्थितीत आम्ही मुलगी असताना फी माफ करण्याचा निर्णय घेतला.”