मुक्तपीठ टीम
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) म्हटले की फक्त राजकीय नेत्यांवरच्या किंवा संबंधित धाडीच, असं आपल्याकडील चित्र आहे. पण ईडीची ही कारवाई महत्वाची. निवृत्त ईडीने एका ईपीएफओ अधिकाऱ्याची १.१३ कोटी रुपयांची मालमत्ता पेन्शनधारकांच्या रकमेचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली जप्त केली आहे. त्याने बेकायदेशीरपणे पेन्शनधारकांची १.६४ कोटी रुपयांची रक्कम आंध्र प्रदेशातील त्याच्या वैयक्तिक खात्यात हस्तांतरित केली होती.
दिल्लीतील ईडीने सोमवारी एक निवेदन जारी केले की, निवृत्त पर्यवेक्षक कोंडापल्ली सत्यनारायण राव आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) कडप्पा उप-प्रादेशिक कार्यालयातील त्यांच्या कुटुंबीयांची १.१३ कोटी रुपयांची मालमत्ता मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ९८.६८ लाख रुपये किमतीचा फ्लॅट आणि १२.६४ लाख रुपयांच्या बँक ठेवींचा समावेश आहे.
पेन्शनच्या रकमेचा गैरवापर करण्यासाठी बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट डेटाशी छेडछाड केल्याचे ईडीला त्याच्या चौकशीत आढळून आले. बनावट बँक खाते क्रमांक आणि बनावट नाव देऊन आरोपींनी पेन्शनच्या रकमेचा गैरवापर केला. तपासात २०११ ते २०१४ दरम्यान आरोपी आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या खात्यात एकूण १.६४ कोटी रुपये जमा झाल्याचे आढळून आले.
सीबीआयच्या हैदराबादस्थित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एफआयआरच्या आधारे ईडीने राव आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार मालमत्ता जप्त करण्यात आली.