मुक्तपीठ टीम
केजे अभियांत्रिकी व व्यवस्थापन संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास खोत यांना ‘आऊटस्टँडिंग लीडर इन हायर एज्युकेशन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हॉटेल नोवोटेल येथे नुकत्याच झालेल्या इलेट्स एज्युकेशन इनोव्हेशन समिटमध्ये इलेट्स टेक्नोमिडीयाचे वरिष्ठ व्यवस्थापक अभिषेक सिंग तोमर व सीए मयूर झंवर यांच्या हस्ते या पुरस्काराने डॉ. खोत यांना सन्मानित करण्यात आले.
गेल्या २७ वर्षात उच्च शिक्षणामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. खोत यांना हा पुरस्कार देण्यात आला. केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव यांनी या सन्मानाबद्दल डॉ. खोत यांचे अभिनंदन केले. याआधी डॉ. खोत यांना नवी दिल्ली येथील इंटलेक्च्युअल पीपल फाउंडेशनच्या वतीने ‘बेस्ट प्रिन्सिपल परफॉर्मन्स अवार्ड’ने सन्मानित केले आहे.
सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पदवीधर असलेल्या डॉ. खोत यांनी औरंगाबाद येथून एमटेक केले. त्यात त्यांनी सुवर्णपदक मिळवले. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पीएचडी पूर्ण केली असून, ‘फंडामेंटल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस अँड इट्स कॅरॅक्टरिस्टिक्स विथ ऑप्टिमायझेशन’ असा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
वयाच्या ३९ व्या वर्षांपासून प्राचार्य म्हणून ते काम पाहत आहेत. गेल्या ७ वर्षांपासून केजे महाविद्यालयाचा कार्यभार सांभाळत आहेत. आजवर खोत यांचे २५ हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो.