मुक्तपीठ टीम
सांगलीचा पावसाळा म्हटलं की कृष्णा नदीचा पूर हा तसा धडकी भरवणाराच. २०१९ आणि २०२१ ही दोन वर्षे पुराचा फटका बसल्यामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका खास खबरदारी बाळगते. यावेळीही पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींचा सामना संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी आपत्तीपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. आपत्ती मदत साहित्य आणि साधनांसह नदीपात्रात प्रात्यक्षिके करण्यात आली. संभाव्य आपत्ती उद्भवलीच तर त्यावेळी लोकांची मदत आणि बचावासाठी सांगली महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
सांगलीला २०१९ आणि २०२१ मध्ये महापूराचा सामना करावा लागला होता. मात्र २०२१ मध्ये सर्व विभागांचा योग्य समन्वय साधता आल्याने कोणितीही वित्त अथवा जीवित हानी झाली नाही. यंदाच्या वर्षीही १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने महापालिका प्रशासनाने आपल्या सर्व यंत्रणांचा आपत्तीपूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत कृष्णानदी पात्रात मदत आणि रेस्क्यूची प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच सर्व आपत्ती मदत साहित्य , बोटी आणि अन्य उपलब्ध साधनांची प्रात्यक्षिके सुद्धा यावेळी घेणेत आली. सांगलीच्या कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर कृष्णा पात्रात आपत्तीपूर्व तयारीची प्रात्यक्षिके घेणेत आली. यावेळी मनपाचे उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त संजीव ओव्होळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, नगरसेवक युवराज बावडेकर , मनपाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश सावंत, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांच्यासह स्पेशल रेस्क्यू टीम, रॉयल कृष्णा बोटक्लबचे प्रतापदादा जामदार, वाईल्ड लाईफ सोसायटीचे संदीप डमडेरे, इंसाफ फौंडेशनचे मुस्तफा मुजावर, पर्यावरण प्रेमी संजय चव्हाण यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सर्व कर्मचारी, प्राणी, पक्षी मित्र तसेच पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. यावेळी आपत्ती काळात नदी पात्रात एखादे वेळेस कोणी व्यक्ती बुडत असेल तर त्याला तात्काळ कसे वाचवता येते याचे प्रात्यक्षिक घेणेत आले.
दरम्यान, संभाव्य पूर आपत्तीसाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आपल्या सर्व साहित्य साधनासह सज्ज असून संभाव्य आपत्तीकाळात नागरिकांना महापालिका प्रशासन वेळोवेळी ज्या सूचना देईल त्याचे पालन करावे असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
पाहा व्हिडीओ: