मुक्तपीठ टीम
देशात लसीकरण जोरात सुरू आहे. प्रत्येकालाच काही ना काही प्रश्न पडतात. त्यात काही उपद्रवी लोक अफवाही पसरवतात. त्यामुळेच कोरोना लसीकरणाबद्दलच्या काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे.
कोरोना लसीकरणानंतर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? जर त्याची एखाद्याला अॅलर्जी असेल तर काय करावे? कोरोनाच्या ‘कोविशील्ड’ लसीसंबंधित अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिली आहेत.
१. कोविशील्ड लस घेण्यापूर्वी लस देणाऱ्यास कोणती माहिती देणे गरजेचे आहे?
कोणत्या औषधाची, पदार्थाची किंवा लसची गंभीर अॅलर्जी आहे का?, ताप आहे, किंवा रक्तस्त्रावाचा आजार आहे, प्रतिकारशक्ती कमी आहे आणि रोग प्रतिकारशक्ती प्रणालीवर परिणाम करणारी कोणती औषधे घेत आहात, गर्भवती किंवा गर्भधारणेचे नियोजन करत आहात का, कोरोना संरक्षणासाठी लस आधी घेतली होती का अशा सर्व गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे. ही लस फक्त डेल्टॉइड स्नायूंमध्ये दिली जाते. या कोर्समध्ये ०.५ एमएल चे दोन वेगवेगळे डोस आहेत.
२. कोविशील्ड लस कोणी घेऊ नये?
या लसीच्या शेवटच्या डोसनंतर जर गंभीर अॅलर्जी झाली असेल किंवा लसीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही घटकाने अॅलर्जी होत असल्यास त्यांनी ती लस घेऊ नये.
गर्भवती किंवा स्तनपान करत असलेल्या महिलांनी डॉक्टरांशी चर्चा करून योग्य सल्ला घ्यावा.
३. कोविशील्ड लसीकरणानंतर कोणत्या प्रकारचे साइडइफेक्ट दिसू शकतात?
इंजेक्शनच्या ठिकाणी गाठ येणे, त्याजागी वेदना होणे, लालसरपणा, खाज सुटणे, सूज येणे आणि जखमा होणे, अस्वस्थ वाटणे, थकवा येणे (अशक्तपणा), मळमळणे, थरथरणे किंवा ताप येणे डोकेदुखी, स्नायूदुखी, फ्लूसारखी (तीव्र ताप, घसा खवखवणे, वाहणारे नाक, खोकला) लक्षणे आढळतात.
चक्कर येणे, भूक न लागणे, ओटीपोटात वेदना, फुगलेल्या लिम्फ नोडस्, घाम येणे, त्वचेला खाज सुटणे किंवा पुरळ उठणे असे दुष्परिणाम लसीकरणानंतर १०० पैकी १ व्यक्तींमध्ये दिसून येतात.
४. लसीकरणाचे दुष्परिणाम झाल्यास काय करावे?
कोविशील्ड लसीच्या पहिल्या डोसानंतर, एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडल्यास आणि दुष्परिणाम जाणवत असल्यास, जवळच्या रुग्णालयात न्या. त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.
जर लसीकरणानंतर झालेल्या दुष्परिणामांची माहिती देण्यासाठी जवळच्या रुग्णालयात जाऊ शकत नसाल तर कोविशील्डच्या दुष्परिणामांशी संबंधित प्रश्न विचारण्यासाठी हेल्प डेस्कच्या १८००१२००१२४ या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.
५. लसीमध्ये कोणत्या औषधांचा वापर केला आहे?
कोविशील्डच्या लसींमध्ये एल-हिस्टिडाइन, एल-हिस्टिडाइन हायड्रोक्लोराइड मोनो हायड्रेट, मॅग्नेशियम क्लोराईड हेक्सा हायड्रेट, पॉलिसोरबेट ८०, इथेनॉल, सुक्रोज, सोडियम क्लोराईड, डिस्डियम एडेट डायहाइड्रेट (ईडीटीए), इंजेक्शन वॉटर यांचा समावेश आहे.
तसेच लसीमध्ये एसएआरएस-कोव्ह -२ हे नाही आहे, यामुळे लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होऊ शकत नाही.