उदयराज वडामकर / कोल्हापूर
वर्षातून एकदा घरात विराजमान होणारा बाप्पा…. या दिवसाची गणेशभक्त जितक्या आतुरतेने वाट पाहतात तितकीच आतुरता माहेरवाशीण गौराईच्या आगमनाचीही असते. गौराईचं घरात सोनपावलांनी आगमन होणं म्हणजे भक्तांचा उत्साह द्विगुणीत होण्यासारखाच. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा करण्याच्या प्रथा परंपरांचं स्वरुप जितकं वेगळं तितकंच ते अद्वितीय आणि मन प्रसन्न करणारंही आहे.
आपल्या कोल्हापुरातही गौराईचं अगदी उत्साहात, आनंदात स्वागत करण्यात आलं. गौरीचं वाहन आणण्यापासून ते अगदी गौरीला घरात विराजमान करेपर्यंतची प्रथा ही वेगळीच म्हणावी लागेल. माहेरवाशिणी गौरी वाहन आणण्यासाठी नदी किनारी जातात. झिम्मा फुगडीचा घेरा घालतात. गौराईला स्नान घालून नवीन पाण्याचे कलश भरले जातात. आरती केली जाते. आणि त्यानंतर वाजत गाजत तिला घरी आणलं जातं. गावाकडे पायवाटांवरुन गौरीचं स्वागत करण्याची पद्धत आता थोडी बदलली आहे. आताची गौरी ही आधुनिकच त्यामुळे गौराईला टू व्हिलरवरुन आणलं जातं. गौराबाईसोबत सेल्फीही काढली जाते.
घरात प्रवेश करताना पायावर पाणी घातलं जातं. पाण्याने भरलेल्या कलशावर हळदीकुंकू लावलं जातं. घरात प्रवेश करताना पूजन करणारी महिला गवर घेऊन आलेल्या मुलीला विचारते.. कोणत्या पायाने आलीस? उत्तर मिळतं हळदीकुंकवाच्या पायाने.. नंतरचा प्रश्न विचारला जातो की, काय घेऊन आलीस? उत्तर मिळतं भाजी भाकरी घेऊन आली. कशावरुन आलीस? उत्तर मिळतं, हत्तीवरुन आली.
अशी ही गंमत जंमत …गौरी आगमनापासून ते गौरी विराजमान होईपर्यंत आणि तिचे गोडाधोडाचे, तिखटाचे लाड पुरवेपर्यंतच्या आपल्याकडच्या प्रथा परंपरा विविधतेने नटलेल्या आहेत. यातूनच हा परंपराचा वसा पुढच्या पिढीकडे जात असतो.