मुक्तपीठ टीम
औरंगाबाद सभेप्रकरणी अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्याविरोधात सांगली जिल्ह्यातील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. २००८च्या एका जुन्या प्रकरणात हे अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेत मशिदींवरील भोंग्याप्रकरणी आक्रमक भूमिका मांडली होती. त्यात त्यांनी मशिदींवरील भोंगे काढली नाहीत तर…याबद्दल चिथावणीखोर भाषा वापरल्याचा आरोप आहे. तसेच सभेत जर कोणी गडबड केली तर चौरंग करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकली. त्यानंतरच औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ११६, ११७ आणि १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे नेत्यांना पोलिसांकडून नोटीस
- राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये झालेल्या सभेनंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत.
- राज ठाकरे यांच्या सभेनंतर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे.
- त्यामुळे आपण तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करु नये म्हणून पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत.
- मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनाही पोलिसांना नोटीस पाठवल्या आहेत.
राज ठाकरेंना सांगली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी!
- राज ठाकरे यांच्याविरोधात सांगली शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.
- राज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या अजामिनपत्राचे वॉरंट हे वर्ष २००८ मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका गु्न्ह्यातील आहे.
- राज यांच्याविरोधात भारतीय दंड विधान १०९,११७,१४३ आणि मुंबई पोलीस कायदा १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- सांगली कोर्टाने या प्रकरणी थेट मुंबई पोलीस आयुक्तांना राज ठाकरे यांना सांगली कोर्टात अटक करून हजर राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे.
- सांगलीतील मनसे कार्यकर्ता तानाजी सावंत यांनी मराठी पाट्या आणि मराठीच्या मुद्यावर आंदोलन केले होते.
- यावेळी काही दुकाने बळजबरी बंद करण्याचा प्रयत्न केला होता.
- त्यानंतर तानाजी सावंत यांच्यासह पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.