मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे देशात खळबळ उडाली आहे. दरम्यान पुन्हा एकदा चलनी नोटांतून कोरोनाचा संसर्ग होण्याची चर्चा होत आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने याआधीही केंद्रसरकारला चलनी नोटांमधून होणाऱ्या संसर्गाबद्दल विचारणा केली होती. अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र अद्याप केंद्र सरकारने आणि आयसीएमआर यांच्याकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. यामुळे कॅटने खेद व्यक्त केला आहे. कॅटने याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया आणि आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गव यांच्याकडे चलनी नोटांतून होणाऱ्या विषाणूंच्या प्रसाराविषयी मत मागितले आहे. तसेच ऑस्ट्रेलियांसारख्या देशांप्रमाणे कागदीऐवजी पॉलिमरचा नोटांचा पर्यायही सुचवला आहे.

महत्वपूर्ण मुद्द्यावर मौन का? कॅटचा केंद्र सरकारला प्रश्न
- कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षांपासून सरकारकडे पत्रव्यवहार केला जात आहे.
- मात्र, केंद्र सरकार आणि आयसीएमआर यांच्याकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
- कोरोना विषाणूचा चलनी नोटेद्वारे होणाऱ्या प्रसाराविषयी अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
- कोरोना विषाणू प्रसाराचे अनेक माध्यमे आहेत. त्यापैकी चलनी नोटा देखील माध्यम ठरू शकते.
- लाखो व्यापारी चलनी नोटांच्या संपर्कात असतात.
- चलनी नोटांतून विषाणू प्रसार होत असल्याचे सिद्ध झाल्यास लाखो व्यापारी आणि ग्राहकांसाठी मोठी धोक्याची घंटा ठरू शकते.
- सर्वप्रथम २ सप्टेंबर, २०१८ रोजी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे सर्वप्रथम स्पष्टीकरण मागितले.
- त्यानंतर वर्ष २०१९, वर्ष २०२० आणि वर्ष २०२१ मध्ये आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरला अनेकवेळा स्मरणपत्रे पाठविली.
- मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण प्राप्त झाले नाही.
- त्यामुळे महत्वपूर्ण मुद्द्यावर मौन का असा प्रश्न कॅटच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे.
कॅटकडून अनेक दावे
- कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केंद्र सरकारला पाठविलेल्या पत्रात चलनी नोटांतून होणाऱ्या विषाणू प्रसाराचा दावा केला आहे.
- त्यासाठी देशात तसेच जागतिक स्तरावरील विविध संशोधनांचे संदर्भ दिले आहेत.
- केवळ कोरोना नव्हे तर अन्य रोगांना कारण ठरणाऱ्या विषाणूंचा प्रसार नोटांमार्फत घडत असल्याचा दावा कॅटने केला आहे.
- जर्नल ऑफ करंट मायक्रोबायोलॉजी अँड अप्लाईड सायन्सेस, इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मा अँड बायो सायन्स, इंटरनॅशनल जर्नल ऑफ अडवॉन्स्ड रिसर्चच्या अहवालाचा संदर्भ दिला आहे.
- ग्राहकांदरम्यान चलनी नोटांच्या हस्तांतरणावेळी विषाणूंचे संक्रमण होत असल्याचे वरील निष्कर्षातून सिद्ध झाल्याचा दावा कॅटने पत्राद्वारे केला आहे.
पॉलिमर नोटांचा पर्याय
कॅटने केवळ शंका व्यक्त केलेली नाही. तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन या देशांनी स्वीकारलेला पॉलिमर नोटांचा पर्यायही सुचवला आहे.