मुक्तपीठ टीम
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाची उमेदवारी ही माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांना जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. २०१९पूर्वी सातत्यानं शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात यावेळी शिवसेना लढणार नसल्यानं काँग्रेस आणि भाजपात लढत होणार आहे. काँग्रेसची उमेदवारी दिवंगत आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना देण्याची शक्यता आहे, मात्र आता सत्यजीत जाधवांमुळे आणखी मजबूत उमेदवार देण्यावर चर्चा सुरु झाली आहे.
कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब…
- कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून सत्यजीत कदम यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
- राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी कदम यांचं नाव जाहीर केलं आहे.
- उमेदवारीसाठी सत्यजीत कदम आणि महेश जाधव यांच्यात चुरस होती.
- मात्र, अखेर भाजपाकडून सत्यजीत कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
- आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास सत्यजीत कदम यांनी व्यक्त केला आहे.
कोण आहेत सत्यजीत कदम?
- कदम हे शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते शिवाजीराव कदम यांचे पुत्र आहेत.
- २०१० मध्ये कदम काँग्रेसकडून कोल्हापूर मनपात नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
- २०११ आणि २०१२ मध्ये त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणून देखील काम केलं आहे.
- २०१५ मध्ये त्यांची ताराराणी आघाडीचे गटनेते म्हणून निवड झाली होती.