अशोक कुलकर्णी
मला अनेक गणेश भक्तांचे गणेशोत्सवात अकस्मात येणाऱ्या अडचणीबद्दल फोन , मेसेज आले. मला आलेले प्रश्न व त्यांची दिलेली उत्तरे सर्वांना माहितीसाठी पाठवत आहे.
प्रश्न क्र १ :- गणेश स्थापना मुहूर्त कोणता?
उत्तर:- गणेश स्थापना हे तिथीप्रधान व्रत असल्यामुळे भाद्रपद शु. चतुर्थी दिवसभरात कधीही पण शक्यतो सूर्योदयापासून मध्यान्ही पर्यंत कधीही स्थापना करता येते . उशीर होणार असेल तर दुपारपर्यंत संकल्प करून दुपारी स्थापना झाली तरी चालेल . त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, स्थिर राशींचा कालावधि, भद्रा (विष्टि करण), चौघडीया मुहूर्त (अमृत, लाभ) इत्यादि पाहण्याची गरज नाही .
प्रश्न क्र २ :- घरातील महिला गर्भवती असल्यामुळे मूर्ती विसर्जन करावे की नाही?
उत्तर :- याला काहीही शास्त्रीय आधार नाही . आपल्या घरात नवीन बाळाचे आगमन होणार असते , अशा वेळेस सर्वांची मने हळवी झालेली असतात व त्या वेळी गणेशाचे बालरूप कसे विसर्जित करावे , असा भोळा समज त्यामागे आहे .
प्रश्न क्र ३ अशौच ( सोयर व सुतक ) आल्यास गणपती नंतर बसवला तर चालेल का?
उत्तर :- पार्थिव गणपती पूजन हे व्रत आहे कुलाचार नाही , त्याचा एखाद्या वर्षी लोप झाला तरी चालतो , पुढील वर्षी बसवता येतो .
पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शु चतुर्थी हा एकच दिवस असल्याने, त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थीपूर्वी अशौच संपत नसेल, तर त्या वर्षी गणपति बसवू नये. येथे स्थापना दिवस महत्वाचा असल्यामुळे पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येणार नाही.
प्रश्न क्र ४ :- आता अशौचामुळे शक्य नसल्यामुळे अश्विन नवरात्रात गणपती बसवला तर चालेल का?
उत्तर:- आश्विन मासातील नवरात्रात विनायक चतुर्थीस राहिलेले गणपति पूजन करू नये त्याला काहीही शास्त्राधार नाही . अनेकजण गौरी पण अडचण आल्यास नवरात्रात बसवतात . ते पण शास्र मान्य नाही .
प्रश्न क्र ५ यंदा कोरोनामुळे गावी दहा दिवस थांबता येणार नाही तर पाच दिवसात विसर्जन केले तर चालेल का?
उत्तर :- अडचणीच्या काळात दीड दिवस , तीन , पाच , सात दिवसात विसर्जन करू शकता .
गणेश स्थापना झाल्यावर अशौच आले तर लगेच दुसऱ्या व्यक्तीकडून गणेश विसर्जन करून घ्यावे , अशौच आल्यावर घरात पार्थिव गणपती ठेऊ नये .
प्रश्न क्र ६:- मागील वर्षी आम्ही बसवलेली गणेशमूर्ती भंगली होती मग आम्ही नवीन आणून बसवली . ते योग्य आहे का?
उत्तर :- गणेश स्थापनेनंतर मूर्ती भंगली तर लगेच विसर्जन करावे , दुसरी मूर्ती आणून परत प्रतिष्ठा करू नये . जर प्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्ती भंगली तर मात्र नवीन आणून बसवू शकता .
प्रश्न क्र ७ आमचे वडील स्वर्गवासी झाले पण सव्वा महिना झाला नाही तर गणपती बसवावा का?
उत्तर :- चौदा दिवस झाल्यावर उदक शांती झाल्यावर सर्व व्रते देवकार्य करता येते . त्यामुळे आरास न करता , साध्या पद्धतीने व भक्ती भावाने गणेश स्थापना करावी .
प्रश्न क्र ८ आम्ही दरवर्षी गावाकडे मोठ्या भावाकडे गौरी गणपतीचा सण साजरा करतो , पण यंदा कोरोनामुळे जाणे शक्य नाही . आम्ही वेगळ्या गौरी गणपती बसवू शकतो का?
उत्तर :- हो , जे भाऊ वेगळे वास्तव्यास आहेत , ज्यांची चूल वेगळी आहे त्या सर्वांना वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो . प्रतिवार्षिक व महालय श्राद्ध सुद्धा वेगळे करावे लागते .
प्रश्न क्र ९ पार्थिव गणेश मूर्तीचा आकार किती असावा ?
उत्तर:- घरी मातीची मूर्ती स्वतः तयार करून त्याचे प्रतिष्ठा व पूजन करावे व ती मूर्ती वाहत्या पाण्यात , जलाशयात विसर्जित करावी असा विधी आहे . त्यामुळे त्याबद्दलचे विशिष्ट नियम नाहीत .
प्रश्न क्र १०:- या वर्षी सार्वजनिक गणपती स्थापना करता येत नाही मग घरामध्ये स्वतःचा एक व सार्वजनिक एक असे गणपती बसवले तर चालतील का?
उत्तर :- गणेशस्थापणा हे एक व्रत आहे , त्याला सार्वजनिक स्वरूप लोकमान्य टिळकांनी दिले . त्यावेळी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती . त्यामुळे घरात फक्त वैयक्तिक व्रताचा गणपती बसवावा . दोन गणेशस्थापणा एकाच घरात करू नये .
प्रश्न क्र ११:- ज्या घरात /कुटुंबात चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यानंतर पण गणेशचतुर्थी पुर्वी मृत्यु झाला असेल त्यांनी गौरी गणपती बसऊ नयेत असे शास्र आहे का?
उत्तर :- पार्थिव गणेश स्थापना हे एक व्रत आहे .आई वडील गेल्यावर मंगल कार्यासाठी जरी वर्षभर अशौच असले तरी कोणतेही व्रत , उपासना करण्यास काहीच हरकत नाही . फक्त रोषणाई , समारंभ नको .
प्रश्न क्र १२ गौरी गणपती मृतकाच्या सुतकाच्या कालावधीत येत असल्यास सुतक संपल्यानंतर लगेच येणाऱ्या चतुर्थीला गौरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पुजा अर्चा, नैवेद्य वगैरे दाखवुन त्याच दिवशी विसर्जन करुन टाकाव्या का?
उत्तर:- पार्थिव गणेश स्थापना हे एक व्रत आहे . त्यामध्ये विशिष्ट दिवशीच म्हणजे गणेश चतुर्थीलाच स्थापना करावी लागते पण उस्थापणा दिवस कुळाचाराप्रमाणे वेगवेगळा असू शकतो . कुणाकडे एक दिवस , कुणाकडे पाच दिवस तर बहुतेक ठिकाणी दहा दिवस गणपती असतात . त्यामुळे स्थापनेच्या दिवशी अशौच असल्यास त्या वर्षी व्रताचा लोप करावा , पण पुढील वर्षी हे व्रत चालू ठेवावे .
प्रश्न क्र १३ गौरी गणपती बसवल्यावर नंतर घरात मृत्यु घडल्यास मृत व्यक्तीच्या अंत्य संस्कारांच्या आधी गौरी गणपतीचे विसर्जन करून टाकावे का?
उत्तर :- हो , घरामध्ये व्यक्ती मृत झाली की लगेच दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडूनही गणेश विसर्जन करून घ्यावे . गौरी पण कुणाकडून उस्थापणा करून घ्यावी .
प्रश्न क्र १४ विसर्जनाचा दिवस शनिवार आल्यास शनिवारी विसर्जन करु नये. दुसऱ्या दिवशी करावे.असा काही नियम आहे का?
उत्तर:- असा कोणताही नियम धर्मशास्रात नाही . गणेश व्रताचे विधान ठरलेले असते , त्यात बदल करू नये .
प्रश्न क्र १५ गौरी गणपती बसल्यानंतर जर घरातील स्त्री बाळंतीण झाली तर काय करावे?
उत्तर:- गणेश स्थापनेनंतर घरात सोयर आले तर दुसऱ्या कुटुंबातील कुणाकडून पुढील पूजा , आरती करून नंतर विसर्जन करावे .
प्रश्न क्र १६ मुर्ती विसर्जनासाठी नेतांना घराबाहेर रस्त्यात भंग पावली तर काय करावे?
उत्तर:- स्थापना केलेली मूर्तीची उत्तरपूजा झाल्यावर भंगली तरी दोष नाही . विसर्जित करावी .
प्रश्न क्र १७:- चार भाऊ चार वेगवेगळ्या गावी राहातात तर ते चारही भाऊ आपापल्या घरी स्वतंत्रपणे गौरीगणपती बसऊ शकतात का?
गौरी गणपती अथवा इतर कुळाचार हे आपल्या मुळ गावी मुळ घरातच साजरे केले पाहिजेत असा नियम आहे का?
उत्तर:- ज्यांचा अग्नी वेगळा झाला आहे , व्यवहार वेगळे झाले आहेत , देवघर वेगळे आहे , त्या प्रत्येकाला वेगळे व्रत करण्याचा अधिकार असतो. मूळ गावीच सर्व व्रते करावीत असा कोणताही नियम नाही.
एकत्रित का करतात , तर त्यामुळे सर्व कुटुंबातील सदस्य त्या निमित्ताने एकत्र येऊन आनंदात साजरा करतात , एकमेकांना भेटतात , सुखदुःख वाटून घेतात , आनंदात समारंभ साजरा करतात!
पण या कोरोना काळात प्रवासावर बंधने आली आहेत , प्रवास धोकादायक झाला आहे त्यामुळे वेगळा गणपती प्रत्येक घरी स्थापना करता येते .