मुक्तपीठ टीम
हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत कंगना रनौत भाजपाची उमेदवार असू शकते, अशी त्या राज्यातील स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गेली काही वर्षे भाजपाच्या बाजूने समाजमाध्यमांमध्ये तसेच प्रत्यक्ष जीवनातही आक्रमक असणाऱ्या कंगनाने नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. या बैठकीपासून अभिनेत्रीच्या राजकारणात प्रवेशाबाबत अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे, कंगना रनौत खरोखरच निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश करते का, हा मुद्दा लक्षवेधी ठरला आहे.
भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांच्या निधनानंतर मंडीची जागा रिकामी आहे. मंडी लोकसभेच्या जागेव्यतिरिक्त, राज्यातील तीन विधानसभा जागांसाठी ३० ऑक्टोबरला रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी हिमाचल भाजपा निवडणूक समिती बैठक धर्मशाळा येथे घेतली जाणार आहे.
कंगनाने निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही
- अभिनेत्री कंगनाने उघडपणे निवडणूक लढण्याची चर्चा केलेली नाही.
- पक्षातील एक गट कंगनाला तिकीट देण्याच्या बाजूने नाही.
- कंगना राणौत ही मंडी जिल्ह्यातील भांबला गावातील आहे.
- नुकतेच तिने मनालीमध्ये आपले नवीन घर बांधले आहे. तो भागही मंडी संसदीय मतदारसंघातही येते.
मंडीच्या निवडणुकीमध्ये कोणाची नावं चर्चेत?
- पंकज जामवाल यांनाही मंडी सीटवरून पोटनिवडणूक लढवायची आहे.
- मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांचे सहकारी निहाल चंद देखील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तिकीटाची वाट पाहत आहेत.
- कारगिल युद्धातील नायक ब्रिगेडियर कुशल ठाकूर देखील तिकीट मिळवण्यासाठी प्रदीर्घ काळापासून वाट पाहत आहेत.
आता या नावांमध्ये कंगनाच्या नावाची भर पडली आहे.