मुक्तपीठ टीम
प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ. आजही बॉलिवूडमधील एक मोठं नाव. पण ग्लॅमरच्या त्या लखलखाटातही ते विसरले नाहीत आपलं माणूसपण. मुंबईच्या चाळीत वाढलेल्या जॅकी श्रॉफनी आपल्यातील चाळकरी संवेदनशीलता जागती ठेवली आहे. त्यामुळे कधी ते त्यांच्या फॉर्महाऊस असलेल्या गावातील गावकऱ्यांना मदतीसाठी चर्चेत येतात नुकतेच ते मावळला गेले ते घरी काम करणाऱ्या मोलकरीण ताईच्या आजीचे निधन झाल्याने. इंडियन आयडॉलमधील सायली कांबळे या स्पर्धक तरुणीच्या चाळीतील लोकांशी ज्या आपुलकीने ते वागले त्यामुळे त्यांची माणुसकी पुन्हा चर्चेत आली.
मावळमध्ये राहणाऱ्या दीपाली तुपे हिची आजी तानाबाई ठाकरे यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. दीपाली तुपे बर्याच वर्षांपासून मुंबईत जॅकी यांच्या घरी काम करते. तिचे गाव मावळात आहे. तिच्या आजीच्या मृत्यूची माहिती मिळताच दीपाली पुण्यात पोहोचली. जॅकी देखील येथे पोहचले आणि संपूर्ण कुटुंबाला धीर दिला. काहीही विचार न करता सर्वसामान्यांप्रमाणे जमिनीवर बसून तिच्या कुटुंबीयांची आपुलकीने चौकशी केली. दीपालीच्या कुटुंबीयांनी त्यांना टॉवेल, टोपी आणि श्रीफळाचा मान दिला.
यामुळे जॅकी दादा यांची माणुसकी पहिल्यांदा दिसली नाही. मावळच्या चांदखेडमध्ये जॅकी श्रॉफ यांचा बंगला आहे आणि बऱ्याचदा ते कामामधून वेळ काढून सुट्टी घालवण्यासाठी तेथे येतात. चांदखेडचे गावकरी सांगतात की, ते येथे फिरायला येतात पण गावकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच तयार असतात.
सर्वात ताजे उदाहरण इंडियन आयडॉलच्या ताज्या भागातील सायली कांबळे या मुंबईकर स्पर्धक मुलीसोबतही त्यांचं आपुलकीचं वागणं मनाला भावणार होतं. सायलीनं ती चाळीत राहते आणि तिचे काही चाळकरी शेजारी जॅकीना भेटायला आल्याचे सांगताच, तेच तेथे गेले आणि आपुलकीने सर्वांना भेटले. सर्व वलय बाजूला भिरकावत चाळकऱ्यांसोबत आपले चाळीतील संघर्षाचे दिवस आठवताना त्यांना जराही संकोच वाटला नाही. ते भावनेनं ओंथबलेल्या शब्दात सारं मांडत राहिले.
सायलीच नाही इंडियन ऑयडॉलमधील प्रत्येक स्पर्धकाला वेगवेगळ्या सुरुपात जॅकी श्रॉफ यांच्या माणुसकीचा अनुभव आला. हा मोठा अभिनेताच खरंतर ह्युमन आयडॉल असल्याचे त्यांच्या लक्षात आले.