मुक्तपीठ टीम
राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी विधानसभेच्या १६ सदस्यांच्या विधिमंडळ समितीची घोषणा वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत केली. समिती चार महिन्यात सभागृहाला अहवाल सादर करेल, असेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना त्यांच्या कारकीर्दीत ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती. याआधी अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना वाचवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचा आरोप करत चौकशी करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. त्यामुळे भाजपा नेत्यांच्या आक्रमकतेला त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी आघाडी सरकारने त्यांच्या कारकीर्दीतील प्रकरणांची चौकशी सुरु करण्याची रणनीती ठरवल्याचे मानले जात आहे.
आमदार रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विधिमंडळाच्या समितीमार्फत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करण्यात येईल. चार किंवा सहा महिन्यात याचा अहवाल सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यानुसार आज वने राज्यमंत्र्यांनी समितीची घोषणा केली.
वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत विधानसभा सदस्य सर्वश्री नाना पटोले, सुनील प्रभू, उदयसिंग राजपूत, बालाजी कल्याणकर, अशोक पवार, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा, शेखर निकम, सुभाष धोटे, अमित झनक, संग्राम थोपटे, आशिष शेलार, नितेश राणे, अतुल भातखळकर, समीर कुणावर आणि नरेंद्र भोंडेकर यांचा समावेश आहे.