इस्रो ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था पिक्सेल-इंडिया उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून रिअल टाइम प्रतिमा २४ तास उपलब्ध होऊ शकेल. इस्रो खासगी भारतीय कंपनीचा उपग्रह येत्या ८ महिन्यात प्रथमच अवकाशात पाठवणार आहे. बंगळुरूमधील अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्टअप पिक्सेल-इंडियाचा निरीक्षणासाठी असलेला उपग्रह ‘आनंद’ पुढील वर्षी अवकाशात जाईल. इस्रोच्या पीएसएलव्ही सी -५१ रॉकेटने अवकाशात झेपावेल.
‘आनंद’ उपग्रह पृथ्वीवरील कोणत्याही घटनेची रिअल टाइम प्रतिमा २४ तास उपलब्ध करून देईल. पिक्सेलच्या उपग्रहांच्या मदतीने, हंगामात पीक आणि मातीमधील बदलांचे परीक्षण केले जाऊ शकेल. पिक्सेलद्वारे ही माहिती थेट शेतकऱ्यांना दिली जाणार नाही, परंतु इतर कोणतीही कंपनी किंवा एजन्सी पिक्सेलकडून डेटा मिळवून एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना पाठवू शकते.
पिक्सेल इंडिया २०२३ पर्यंत एकूण २४ उपग्रह प्रक्षेपित करेल. सर्व उपग्रह इस्त्रोच्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहांच्या आकार आणि किंमतीपेक्षा १० पट छोटे असतील, परंतु सर्व २४ उपग्रह अवकाशात स्थापित केल्यानंतर, २४ तासांत त्याचे जागतिक कव्हरेज होईल.गुरुवारी पीएसएलव्ही सी -५० रॉकेटमार्फत सीएमएस -१ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे अध्यक्ष डॉ. के शिवन म्हणाले होते की, पीएसएलव्हीची पुढील पीएसएलव्ही सी -५१ मिशन ‘आनंद’ उपग्रह इस्रो आणि भारतासाठी खास असेल. अंतराळ क्षेत्रातील सुधारणांची अंमलबजावणी झाल्यानंतर इस्त्रो सुविधांचा वापर करणार्या खासगी क्षेत्राचा हा पहिला उपक्रम असेल.
इस्रो पुढील वर्षी चंद्रयान -३, आदित्य एल -१ लाँच करणार आहे आणि गगनयानला चाचणी उड्डाण देखील पाठवेल. तसेच, जीएसएलव्ही आणि एसएसएलव्हीची मोहीम देखील सुरू ठेवली जाईल. अशाप्रकारे, दरमहा किमान एक किंवा दोन लॉन्चिंग असतील.