मुक्तपीठ टीम
मुंबई दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी दिग्दर्शक हंसल मेहतांच्या SCAM2003 या वेब सीरिजला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. तेलगीची मुलगी सना इरफानने कुटुंबाच्या गोपनीयता, सन्मान आणि स्वाभिमानाच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा करत या वेब सीरिजविरोधात मुंबई दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यात दोषी ठरलेल्या दिवंगत अब्दुल करीम तेलगी ज्येष्ठ पत्रकार, लेखक संजय सिंह यांच्या पुस्तकावर आधारित वेब सीरिजला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. संजय सिंह यांनी एनडीटीव्हीत असताना हा घोटाळा उघड केला होता.
तेलगीचा घोटाळा सोनीवर दिसणार!
- अब्दुल करीम तेलगीची मुलगी सना इरफानने या वेब सीरिजविरोधात मुंबई दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
- ही याचिका फेटाळून लावत न्यायालयाने वेब सीरिजच्या स्क्रीनिंगला स्थगितीस नकार दिला.
- स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी तेलगीच्या घोटाळ्यावर आधारित वेब सीरिज २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
- या वेब सिरीजचे पूर्ण नाव ‘Scam 2003: The Curious Case of अब्दुल करीम तेलगी’ असे आहे.
काय होता तेलगीचा स्टॅम्प पेपर घोटाळा?
- २००४मध्ये तेलगीचा स्टॅम्प पेपर घोटाळा उघड झाला.
- बाजारात असलेला स्टॅम्प पेपरची टंचाईचा फायदा घेत तेलगीने बनावट स्टॅम्प पेपरचा काळा धंदा सुरु केला.
- आधी सरकारी अधिकारी कर्मचारी विकत घेत तो धंदा करत असे, नंतर तो स्वत:च ते छापू लागला.
- राज्यांच्या महसुलाचा मोठा भाग तेलगी टोळी गिळू लागली.
- तेलगीच्या महाघोटाळ्यात अधिकारी, कर्मचारीच नाही तर मोठे नेतेही सामील होते.
तेलगीचा तुरुंगातच मृत्यू…
- कोट्यवधी रुपयांच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये तेलगीला दोषी ठरवण्यात आले.
- त्याला ३० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
- तेलगीचा तुरुंगवास भोगत असताना ऑक्टोबर २०१७ मध्ये बंगळुरूमध्ये मृत्यू झाला.
- तेलगीच्या मुलीने या वेबसिरीजच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
- निर्मात्यांनी कुटुंबाची संमती घेतली नसल्याचा दावा मुलीने केला आहे.
- त्यांच्या वकिलाने सांगितले की, अंतरिम दिलासा देण्याची त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
- सनाने अधिवक्ता माधव थोरात यांच्यामार्फत दाखल केलेल्या खटल्यात आरोप केला की ही मालिका एका पुस्तकावर आधारित होती, यात तथ्यात्मक त्रुटी होत्या.
- वेब सीरिजमुळे कुटुंबाच्या गोपनीयता, सन्मान आणि स्वाभिमानाच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.