मुक्तपीठ टीम
पोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुणे येथे सर्व सुविधायुक्त क्रीडा संकुल आणि क्रीडा वसतीगृह उभारण्यात येईल; आणि या संबंधीच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वानवडी येथे एसआरपीएफ गट-२ परिसरात आयोजित ७१ व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर-२०२२ समारोप कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार महेश लांडगे, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, आयबी नवी दिल्लीचे अतिरिक्त संचालक आर. ए. चंद्रशेखर, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंग, राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१९ मध्ये झालेल्या पोलीस स्पर्धेदरम्यान असे क्रीडा संकुल निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु कोविडमुळे ते शक्य झाले नाही. आता लवकरच हे काम हाती घेण्यात येईल. या क्रीडा संकुलात ॲथलेटीक ट्रॅक, सिंथेटीक टर्फ हॉकी मैदान, सिंथेटीक टर्फ फुटबॉल मैदान, बहुउद्देशिय सभागृह, जलतरण तलाव, वसतीगृह आदी सर्व सुविधा असतील. यामुळे राज्यातील खेळाडूंना फायदा होण्यासोबत राज्याला मोठ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळेल.
आपल्या मन आणि बुद्धीला निकोप आणि सक्षम ठेवण्याचे कार्य खेळामुळे होते. खेळात खिलाडूवृत्तीला महत्व आहे. जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर आव्हानांचा सामना करण्याची क्षमता खेळामुळे निर्माण होते. खेळामुळे जिंकण्याची सवय लागण्यासोबत पराभव पचवण्याची क्षमताही निर्माण होते. खेळाडू हार न मानता प्रत्येक पराभवानंतर नव्या यशासाठी प्रयत्न करतो. त्यामुळेच सुरक्षा दलात खेळाचे विशेष महत्व आहे आणि खेळाडूंना विशेष महत्व दिले जाते. महाराष्ट्रही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचा नावलौकीक उंचावणाऱ्या खेळाडूंना पोलीस उपअधीक्षक पदावर थेट नियुक्ती दिली जाते, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राची एक परंपरा आहे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे विशेष स्थान आहे. राज्याला देशाचे ‘इकॉनॉमिक पॉवर हाऊस’, मुंबईला आर्थिक राजधानी, तर पुण्याला उत्पादन, शिक्षण आणि इनोव्हेशनची राजधानी म्हणून ओळखले जाते, असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.ज्याप्रमाणे सैन्यदले देशांच्या सीमांचे रक्षण करतात त्याप्रमाणे पोलीस दल आणि हे खेळाडू देशातील अंतर्गत सुरक्षेचे कार्य करतात. सैन्य आणि पोलीस दलामुळे देशातील जनता सुरक्षित आहे असे सांगून स्पर्धेत पुरुषांसोबत महिलांचा वाढता सहभाग हे बदलत्या भारताचे दृश्य असून देशासाठी अभिमानाची बाब असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पोलीस महासंचालक सेठ म्हणाले, स्पर्धेत ७ क्रीडाप्रकारांचा समावेश होता. कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, वेटलिफ्टींग या क्रीडा प्रकारांबरोबर या स्पर्धेत प्रथमच आर्म रेसलींग, पॉवरलिफ्टींग आणि बॉडी बिल्डींगचा सहभाग करण्यात आला. स्पर्धेत नामांकीत खेळाडूंनी सहभाग घेतला. यापूर्वी २०१० आणि २०१७ मध्ये महाराष्ट्राने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत २५ राज्याचे आणि ५ केद्र शासीत प्रदेश आणि ६ निमलष्करी दल, रेल्वे पोलीस अशा ३७ संघानी सहभाग घेतला. स्पर्धेत २ हजार पुरुष आणि ६०० महिला खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. महाराष्ट्र पोलीस दलाला खेळाची गौरवशाली परंपरा आहे. राज्य पोलीस दलाने अनेक नामांकीत खेळाडूंना नोकरीत घेऊन चांगली संधी दिली आहे.
अखिल भारतीय पोलीस क्रीडा नियामक मंडळाचे प्रतिनिधी व आयबी नवी दिल्लीचे अतिरिक्त संचालक आर. ए. चंद्रशेखर यांनी प्रास्ताविक केले.विजेत्या खेळाडूंना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रारंभी सर्व सहभागी संघांनी आकर्षक संचलन करून मानवंदना दिली.
पंजाब पहिल्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
स्पर्धेत पंजाब पोलीस दल १७ सुवर्ण, ९ रजत, १५ कांस्य पदकासह ४१ पदके मिळवून सर्वसाधारण विजेते ठरले. दुसऱ्या क्रमांकावरील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाने १५ सुवर्ण १० रजत व १६ कांस्य पदकासह एकूण ४१ पदके मिळवली. महाराष्ट्र पोलीस दलाने १२ सुवर्ण ७ रजत व ११ कांस्य पदकासह एकूण ३० पदके मिळवत सर्वसाधारण तिसरा क्रमांक मिळविला.