मुक्तपीठ टीम
देशात विरोधकांच्या आमदारांना खरेदी करण्याचा आरोप भाजपावर वारंवार केला जात आहे. अशातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजपावर टीआरएसच्या काही आमदारांना खरेदी करण्याचा आणि त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला. आता या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तेलंगणा पोलिसांनी भाजपाचे सर्वोच्च नेते आणि पक्षाचे सरचिटणीस बीएल संतोष यांना समन्स पाठवले आहे. एसआयटीने त्यांना २१ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्यांनी तसे न केल्यास एसआयटी त्यांना अटकही करू शकते.
आतापर्यंत तीन जणांना अटक!!
- समन्स बजावल्यानंतर भाजपा नेते बी.एल.संतोष यांनीही अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे.
- याप्रकरणी तेलंगणा पोलिस सातत्याने छापेमारी करत आहेत.
- आतापर्यंत चार राज्यांतील सात ठिकाणी पोलिस पोहोचले आहेत.
- याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
- २६ ऑक्टोबरच्या रात्री, टीआरएस आमदार पी रोहित रेड्डी यांच्या तक्रारीच्या आधारे, रामचंद्र भारती उर्फ सतीश शर्मा, नंद कुमार आणि सिंहाजी स्वामी यांच्या विरोधात लाचखोरी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या तरतुदींनुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- प्राथमिक माहितीनुसार, रोहित रेड्डी यांनी आरोप केला की, आरोपींनी त्यांना १०० कोटी रुपयांची ऑफर दिली.
- त्या बदल्यात त्यांनी टीआरएस सोडून भाजपामध्ये जावे लागेल, अशी अट घातली होती.
आमदारांना फोनवरून धमक्या येत असल्याच्या तक्रारी
- चार टीआरएस आमदार पायलट रोहित रेड्डी, बी हर्षवर्धन रेड्डी, रेगा कांथा राव आणि गुव्वाला बलराजू यांनी अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे फोन येत असल्याची तक्रार केली आहे.
- त्यांना फोनवरून टीआरएस सोडून भाजपामध्ये येण्यास सांगण्यात आले आहे.
- पैशाचे आमिषही दिल्याचा आरोप आहे.
- आमदारांच्या तक्रारीनंतर रायदुर्गम, बंजारा हिल्स, घाटकेसर आणि गचीबोवली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.