मुक्तपीठ टीम
काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुकाणू समितीची घोषणा केली आहे. या समितीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग, एके अँटनी, पी. चिदंबरम यांच्यासह ४७ काँग्रेस नेते आहेत. काँग्रेसच्या अधिवेशनानुसार, नवीन अध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर सीडब्ल्यूसीचे सर्व सदस्य ताबडतोब त्यांच्याकडे राजीनामे देतात. मग पक्षाचे कामकाज चालवण्यासाठी CWC च्या जागी एक सुकाणू समिती स्थापन केली जाते.
अशा स्थितीत आज मल्लिकार्जुन खरगे नवे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी आधी त्यांचा राजीनामा दिला आणि नंतर खरगे यांनी सुकाणू समिती स्थापन करून सर्वांचा त्यात समावेश केला. याशिवाय सुकाणू समितीमध्ये आणखी अनेक नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल म्हणाले, “सर्व सीडब्ल्यूसी सदस्य, एआयसीसी सरचिटणीस आणि प्रभारींनी आपले राजीनामे काँग्रेस अध्यक्षांना दिले आहेत.”
याआधी काँग्रेसमध्ये पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेणारी समिती सीडब्ल्यूसीमध्ये २३ सदस्य होते. तत्पूर्वी बुधवारी, मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयात अधिकृतपणे पक्षाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
यानंतर खरगे म्हणाले की, काँग्रेसचा वारसा पुढे नेणे ही अभिमानाची बाब आहे. खरगे यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) बैठकीचे अध्यक्षस्थान केले. या बैठकीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही उपस्थित होत्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे २९ ऑक्टोबरला गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. खरगे दक्षिण गुजरातमधील नवसारी येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.