मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. शेतकऱ्यांचा सणासुदीचा काळ आणखी आनंददायी होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या १२व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेच्या १२व्या हप्त्यासाठी १६ हजार कोटी रुपये जारी करणार आहेत.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय कृषी संशोधन संस्था, पुसा, दिल्ली येथे सोमवारी पीएम किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन करतील आणि प्रसंगी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे पीएम-किसान योजनेचे उद्घाटन करतील. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १६ हजार कोटी रुपयांचा १२वा हप्ता जारी करेल.”
शेतकऱ्यांच्या खात्यात योजने अंतर्गत आज पैसे जमा होणार!
- केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त या वर्षी मे महिन्यात हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे किसान सन्मान निधीचा ११वा हप्ता म्हणून २१ हजार कोटी रुपये जारी केले होते.
- कृषी मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदी १७ ऑक्टोबर रोजी पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन करतील आणि शेतकरी आणि कृषी स्टार्टअप, संशोधक, धोरणकर्ते, बँकर्स आणि इतर भागधारकांना संबोधित करतील.
३ हप्त्यांमध्ये २ हजार रुपयांनुसार करून एकूण ६ हजार रूपये मिळतात
- देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, सरकार दर ४ महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांसाठी २ हजार रुपयांचे तीन हप्ते जारी करते.
- अशाप्रकारे ही रक्कम शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
- सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. सध्या बाराव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.
- आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून या योजनेचे लाभ थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केले जातात.
पीएम किसान संमेलनात १३ हजाराहून अधिक शेतकरी उपस्थित राहणार
- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, दोन दिवसीय पीएम किसान संमेलन देशभरातील १३ हजार ५०० हून अधिक शेतकरी आणि १ हजार ५०० कृषी स्टार्टअप्स एका व्यासपीठावर आणतील आणि १ कोटीहून अधिक शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होतील.
- यामध्ये ७०० कृषी विज्ञान केंद्रे, ७५ ICAR संस्था, ७५ राज्य कृषी विद्यापीठे, ६०० पीएम किसान केंद्रे, ५० हजार प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि २ लाख समुदाय सेवा केंद्रे अशा विविध संस्थांचा समावेश आहे.
डीबीटीमधून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार
- पंतप्रधान किसान सन्मान संमेलनाच्या पहिल्या दिवशी, पंतप्रधान डीबीटीमधून कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या PM-किसान या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १६ हजार कोटी रुपयांचा १२वा हप्ता जारी करतील.
- मंत्रालयाने म्हटले आहे की, PM-KISAN हे पंतप्रधानांच्या निरंतर वचनबद्धतेचा परिणाम आहे आणि सर्वसमावेशक आणि उत्पादक कृषी क्षेत्रासाठी धोरणात्मक कृती सुरू करणे आणि सार्वजनिक कार्यक्रम राबविण्याचे उद्दिष्ट आहे.