मुक्तपीठ टीम
ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ २०२५पर्यंत चंद्रावर रोपं लावण्याचा प्रयत्न करतील. या मोहिमेमुळे, भविष्यात चंद्रावर मानवासाठी राहण्याचा मार्ग मोकळा होईल. क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधील जीवशास्त्रज्ञ ब्रेट विल्यम्स यांनी सांगितले की, खासगी इस्रायली चंद्र मोहिमेचा भाग म्हणून रोपं लावण्यासाठी बिया बेरेशीट-२ अंतराळ यानात पाठवल्या जातील. चंद्रावर उतरल्यानंतर या बियांना बंद चेंबरमध्ये पाणी दिले जाईल. त्यांची वाढ आणि विकासाचे जमिनीवरून निरीक्षण केले जाईल. कठीण परिस्थितीत ते किती चांगले तग धरू शकतात आणि किती लवकर उगवू शकतात या आधारे रोपांची निवड केली जाईल. शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलियाच्या रिजेक्शन ग्रासची पसंती केली आहे. रिजेक्शन ग्रास हे सुप्त अवस्थेतही पाण्याशिवाय जगू शकते.
ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा नॅशनल युनिव्हर्सिटीमधील सहयोगी प्राध्यापक कॅटलिन ब्रिट यांनी सांगितले की, जर तुम्ही चंद्रावर रोपं लावण्यासाठी एक प्रणाली तयार करू शकलात तर तुम्ही पृथ्वीवरील सर्वात आव्हानात्मक वातावरणातही अन्न तयार करण्यासाठी एक प्रणाली तयार करू शकता.
‘या’ योजनेकरिता पहिल्या टप्प्यात कोणती तयारी केली जाणार?
- शास्त्रज्ञांनी एका निवेदनात म्हटले आहे की, या प्रकल्पा अंतर्गत, चंद्रावर अन्न, औषधे आणि ऑक्सिजनसाठी रोपं लावणे हा सुरुवातीचा टप्पा आहे.
- हा टप्पा पर्यावरणातील बदलामुळे वाढणाऱ्या अन्नसुरक्षेच्या भीतीला दूर करण्यासाठीही महत्त्वाचा आहे.