अपेक्षा सकपाळ
समाजवादी पार्टीचे संस्थापक नेते आणि भारतीय राजकारणातील एक मोठं नाव म्हणजे मुलायम सिंह यादव. आपल्या राजकीय डावपेचांमुळे वेगळी ओळख निर्माण करणारे मुलायम सिंह यादव यांनी कुस्तीचे आखाडेही गाजवले होते. ते पेशाने शिक्षकी पेशातही होते. त्यांच्या निधनानंतर भारतीय राजकारणानं संघर्षशील पण प्रसंगी समन्वयही साधणारा नेता गमावला आहे.उत्तरप्रदेशातील राजकारणाची दिशा बदलणारं एक संघर्षशील वादळ थंडावलं आहे…
पैलवान…शिक्षक..राजकीय डावपेच, नवे धडे!
- मुलायमसिंह यादव देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव होतं.
- समाजवादी विचारांवर, लोहियावादावर नितांत निष्ठा असणारा एक नेता म्हणजे मुलायम सिंह यादव.
- समाजातील दुर्बल घटक, अल्पसंख्याक घटक यांच्या हक्क रक्षणासाठी ते सतत संघर्ष करत असत.
- उत्तरप्रदेशातील यादव समाज आणि मुसलमान समाजात त्यांचा शब्द अंतिम मानणारा मोठा वर्ग आतापर्यंत आहे.
- ते राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले नेते होते.
- त्यांना भारतीय राजकारणातील आघाडी सरकारचा मोठा अनुभव होता.
- त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी झाला.
- मुलायम सिंह मूळचे उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील सैफई गावचे रहिवासी होते.
- त्यांना कुस्तीची आवड होती, पैलवान म्हणून त्यांनी कुस्तीचे आखाडेही गाजवले.
- ते सुरुवातीच्या काळात शिक्षक म्हणूनही कार्यरत होते.
- शिक्षकी पेशा सोडून राजकारणात प्रवेश करणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी पुढे समाजवादी पक्षाची स्थापना केली.
- ते समाजवादी पक्षाचे नेते आणि पक्षाचे संस्थापक आहेत.
- राम मनोहर लोहियांच्या समाजवादी विचारांच्या प्रभावातून मुलायम सिंह यांची जडणघडण झाली आहे.
- मुलायम सिंह यांचा उत्तर प्रदेशात मोठा प्रभाव होता, त्यातही यादव समाज त्यांच्या शब्दाखातर वाट्टेल ते करण्यास सज्ज असे.
सात वेळा आमदार, तीन वेळा मुख्यमंत्री, केंद्रातही मंत्री!
- मूळचे शिक्षक तसेत पैलवानही असणारे मुलायम सिंह यादव यांनी लोहियांच्या वैचारिक प्रेरणेतून शिक्षकी पेशा सोडून राजकारणात प्रवेश केला.
- मुलायम सिंह १९८९ ते १९९१, १९९३ ते १९९५ आणि २००३ ते २००७ या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
- ते १९७४ ते २००७ या काळात सात वेळा उत्तर प्रदेश विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले.
- ते १९९६ ते १९९८ दरम्यान केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री राहिले आहेत.
मुलायमसिंह यांचा राजकीय प्रवास
- मुलायम सिंह यांचा केंद्रीय राजकारणात प्रवेश १९९६ मध्ये झाला.
- त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव करून संयुक्त आघाडीने सरकार स्थापन केले.
- पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील या सरकारमध्ये त्यांना संरक्षणमंत्री होते.
मुलायम सिंह यांचा संघर्ष
- राष्ट्रवाद, लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांवर मुलायमसिंह यादव यांचा अढळ विश्वास होता.
- समाजातील इतर मागासवर्गीयांच्या, मुसलमानांच्या हक्कांसाठी त्यांचा संघर्ष सतत होत असे.
- मुलायमसिंह गावोगावी त्यांचं वैयक्तिक परिचयाचं जाळं पसरलेलं होतं. .
भाजपाशी वैचारिक वैर, वाजपेयींशी वैयक्तिक मैत्री!
- मुलायमसिंह यादव यांचे लोहियावादामुळे काँग्रेसशी तसेच भाजपाशीही राजकीय संघर्ष होता.
- मुलायमसिंग यादव यांचे अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी त्यांचे वैयक्तिक संबंध अतिशय सौहार्दपूर्ण होते.
अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता!
- उत्तरप्रदेशाच्या राजकारणात मुलायम सिंह यादव हे अशक्य ते शक्य करून दाखवणारे नेते म्हणूनही ओळखले जात.
- ज्या मायावतींशी त्यांचं राजकीय हाडवैर होतं, त्याच मायावतींच्या बसपासोबत त्यांनी सरकारही स्थापन केले होते.
- तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींशी असलेल्या संबंधांमुळे का असेना, पण २००३ मध्ये त्यांनी भाजपाच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने राज्यात आपले सरकार स्थापन केले होते.
वारसा अखिलेश यादवांकडे…
- २०१२ मध्ये त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर यादव कुटुंबात दोन गट पडले
- अखिलेश यांच्या नेतृत्वाखालील गटांपैकी एकाला त्यांच्या वडिलांचे चुलत भाऊ आणि सपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम गोपाल यादव यांचा पाठिंबा आहे.
- प्रतिस्पर्धी गटाचे नेतृत्व मुलायम सिंह करत होते आणि त्यांचे बंधू आणि पक्षाचे राज्यप्रमुख शिवपाल यादव यांचा पाठिंबा होता.
- २०१७ च्या राज्य निवडणुकांदरम्यान, अखिलेशसोबतचे त्यांचे भांडण तीव्र झाले.
- समाजवादी पार्टीतही फूट पडली, पण नंतर सामोपचाराने तो वाद मिटला.
- समाजवादी पार्टीचा आणि आपला वारसा त्यांनी अखिलेश यादव यांच्याकडेच सोपवला.