दिलीप नारायणराव डाळीमकर
मे महिन्याचा दिवस होता. दुपारची वेळ रणरणत्या उन्हात एक मळकट फाटक्या कपड्यातला माणूस बँडेज पट्टी मागत होता.
त्याच्या हाताच्या बोटाला लागले होते.बोटातून भळाभळ रक्त निघत होते.
त्यांचे विचारले “शेठ बँडेज किती रुपयाला आहे”मी उत्तर दिले “अडीच रुपयाला एक”
बँडेज ची किंमत ऐकताच तो माघारी जाऊ लागला.मी त्याला विचारले “काय झालं”
त्याने उत्तर दिलं “माह्याकडं एकच रूप्या हाय” खिश्यात पैसे नसल्याने तो किंमत ऐकूनच परत चालला होता.
त्याच्या हाताचे रक्त काही करता थांबत नव्हते.त्याला मी शेजारी असलेल्या डॉक्टर कडे घेऊन गेलो.डॉक्टरने त्याच्या बोटाची ड्रेसिंग पट्टी केली व काही औषधी लिहून दिली.
त्याची परिस्थिती डॉक्टरला सांगितल्यावर डॉक्टरने त्यांची फी घेतली नाही.
त्याला औषधी दिली व जेवणानंतर त्याला औषधी घ्यायला सांगितली..त्यावर तो म्हणाला-‘‘भाऊ! मी रमेश. लोक मला रमश्या म्हनत्यात. म्या त्या टिनपत्राच्या लोहा लोखंडाच्या दुकानात चार दिसपासून कामाले हाय. पत्रे उचलता उचलता मले बोटाले लागलं तं म्या शेठजीले दवाखान्यात जायले पैसे मांगतले तं शेटजी मले म्हणला हे बँडेज साठी एक रुपया घे.अन तुंह्या हप्ताभर पगाराचे ऐतवारी तुझे पैशे देईन.’ भाऊ! म्या खावं काय? आन् ऱ्हावं कसं?’’
त्याचं खपाटी गेलेलं पोट, निस्तेज चेहरा, डोळ्यातील केविलवाणे भाव पाहून मला कससंच झालं.मुख्य म्हणजे त्याला माझ्याविषयी विश्वास वाटत असावा. आशा वाटत असावी; त्यामुळेच त्यानं मला त्याच्या समस्येविषयी सांगितलं असलं पाहिजे, असं मला वाटलं. मी त्याला औषधे दिली व गल्ल्यातून पन्नास रुपयांची नोट काढून मी त्याला दिली. राईस प्लेट खाऊन औषधी घ्यायला सांगितली.
नंतर दीड महिन्यानंतर रमेश भेटला.तो म्हणाला-“भाऊ तुम्ही देल होते ते पन्नास रुपय घ्या व त्यादिवसचं औषधी किती झालंत ते बी पैस घ्या.डॉक्टरले त्यायच्या पट्टी अन तपासायचे पैसे देऊन टाकतो”
मी रमेशला सांगितले की पैसे नको देऊ
तुला औषधी व पैसे माझ्याकडुन तसेच दिले होते.मी रमेशला विचारलं -“रमेश तू कोणत्या गावाचा, तुला बायको लेकरंबाळ आहेत का ?’’‘‘भाऊ लेकरं बाळ बायको हायती, पण काय करणार?’’
मी नकळत त्याच्या मनाला खोलवर झालेल्या जखमेला धक्का लावला असावा. कारण त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं. मनात दडवून ठेवलेलं दु:ख त्याच्या शब्दातून बोलकं होऊ लागलं. ‘‘भाऊ! खेडय़ावर माझी दोन एकर कोरडवाहू जमीन .स्वत:चा बैल बारदाना काहीच नाही.गेल्या चार वर्षांपासून दुसहल. दुष्काळानं जमिनीतून काहीच उत्पन्न मिळू शकलं नाही. पदरी बायको आणि दोन मुलं. त्यांना गावी ठेवलं आणि कामाच्या शोधात इथवर आलो. म्हटलं काही कमाई करू आणि ती घेऊन गावी जाऊ. पण भाऊ! कमाई तर दूर ऱ्हायली. समदी गमाईच सुरू हाये.खायला शहरात महागाई.अगोदर बोटाले लागले म्हणून दोन दिस दोस्तांकड भोसरीले गेलतो अन तिथंच बिमार पडलो.
जेवढं कमावलं तेवढं खाण्यात व दवाखान्यात गेलं.थोडसं पैसं शिल्लक होतं.म्हणून भोसरीवरून तुमची उधारी द्यायल आलो.आता गावी जाऊन बायको पोरांना तोंड कसं दाखवू? त्यांना खायला काय घालू?’’
मी त्याला सांगितले – “रमेश मला तू औषधीच पैसे देऊ नकोस.तू माझी उधारी फेडायला आला आहेस.पण मी तुझ्याकडुन पैसे घेणार नाही. तुला औषधी फुकट देऊन मी काही तुझ्यावर उपकार करत नाही तर तुझ्यासारख्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीच्या अडचणीवेळी कामी येऊन मी समाजाची उधारी फेडत आहे.तू एक दोन दिवसात पुन्हा भेट तुझ्यासाठी कुठंतरी चांगलं काम बघतो”
हताश, निराश,काहीसा खचलेला रमेश गावाकडं परत जायला निघाला दिशाहीन मार्गानं..
.. नंतर पुन्हा कधीही रमेश भेटला नाही.
शेतकरी पुत्र ; लेखक- सामाजिक राजकीय विषयावर लेखन
ग्रामीण जीवनावर आधारित कविता लेखन