मुक्तपीठ टीम
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनातून भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अनमोल ठेवा चित्रस्वरूपात एकत्रित पाहायला मिळत आहे. स्वातंत्र्यलढ्याचे विविध टप्पे या प्रदर्शनातून उलघडत आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिक, विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज केले.
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, अहमदनगर कार्यालयातर्फे जिल्हा माहिती कार्यालय, बीड व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे आदि मान्यवर उपस्थित होते.
दिनांक १५ ते १७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अहिल्याबाई सांस्कृतिक सभागृह, भाजी मंडई रोड येथे सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनात मराठवाडा मुक्ती संग्राम आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील (सन १८५७ ते १९४७) विविध महत्त्वाच्या घडामोडी आणि थोर स्वातंत्र्य सेनानी यांची जीवनगाथा छायाचित्र तसेच माहिती स्वरुपात मांडण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती चित्र स्वरुपात पाहण्यासाठी या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनास भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाच्या वतीने विशेष पुस्तक प्रदर्शन देखील येथे मांडण्यात आले आहे.
तांबवेश्वर कला पथकाच्या शाहिरी पोवाड्यांच्या जयजयकारात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या भारतमाता की जय या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रदर्शन पाहण्यासाठी विविध शालेय विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांनी सेल्फी घेतली. स्वाक्षरी फलकावर मान्यवरांनी स्वाक्षरी केली. या तीन दिवसीय प्रदर्शनादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ सप्टेंबर रोजी भारत सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम, जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या वतीने राष्ट्रीय पोषण माह निमित्त सकस आहाराचे प्रदर्शन व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.