मुक्तपीठ टीम
मशिदींवरील भोंग्यातून अजानविरोधी मोहिमेतून हिंदुत्वासाठी अतिआक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेची भाजपाशी युती होणार असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. पुढे काहींनी संविधानाच्या १०व्या परिशिष्टातील बंधनामुळे दुसऱ्या पक्षात विलिनीकरणाच्या अटीची पुर्तता करण्यासाठी शिंदे गटाचे आमदार मनसेत जातील की काय, अशाही बातम्या आल्या. पण तसं काही अद्याप झालं नाही. आता मात्र, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवरून थेट शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे आता मनसेच्या इंजिनाने या सरकारविरोधात शिट्टी वाजवण्यास सुरुवात केल्याचं मानलं जातं.
आमदार राजू पाटील यांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटरवर आपला संताप व्यक्त केला आहे.
“बंड झाले, आता थंड झाले?
पालिकेत नगरसेवक नाहीत,
जिल्ह्याला पालकमंत्री नाही,
राज्याला मंत्री नाहीत,
मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय,
सर्वकाही ठप्प आहे.
तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत.
रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल?”
बंड झाले,आता थंड झाले ?
पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत,मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय,सर्वकाही ठप्प आहे.
तुमचं सर्व ओक्के आहे हो,पण लोकांचे सण आलेत.रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे.याकडे कोण बघेल ?@mieknathshinde
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 8, 2022
दोघांचं मंत्रिमंडळ, एक आमदार आणि टीका!
- प्रमोद (राजू) रतन पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत.
- २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर ते मनसेचे विधानसभेतील एकमेव आमदार आहेत.
- त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यात लांबलेल्या निवडणुका, राज्यात दोन जणांचे मंत्रिमंडळ चालवणाऱ्या शिंदे – फडणीवस सरकारचे धोरण यावर टीका केली आहे.
- शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकार कोसळलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या युतीचं सरकार सत्तेत आलं.
- आता जवळपास सव्वा महिना झाल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.
- त्यामुळे दोघांचे सरकार, दुचाकी सरकार अशी टीका सुरु आहे.
- मंत्री नसल्याने सरकारचे कामकाज नोकरशाहीच्या माध्यमातून चालत आहे.
- त्यातच मंत्री नसल्याने जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री नाहीत.
- नव्या सरकारने मनपा, नपा, नप आणि इतर निवडणुका लांबवल्याने आता नगरसेवही नाहीत.
- त्यामुळे लोकांची कामे रखडत आहेत.
- त्याच मुद्द्यावर आमदार पाटील यांनी या मुद्द्यावर शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
- मनसेकडून प्रथमच अशी थेट टीका झाल्याने भाजपाविरोधी मतांमध्ये वााटा मिळवण्यासाठी मनसे वेगळ्या भूंमिकेत जाण्याच्या विचारात आहे की भाजपाला अस्तित्वाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आहे, अशी चर्चा सुरु आहे.