हेमंत कृष्णा पाटील
मराठी चित्रपट सृष्टीचा प्रारंभीचा काळ …! म्हणजेच या क्षेत्रातील बिनभिंतीची शाळा! या शाळेत ‘अनुभव’ हाच प्रत्येकाचा गुरु. या शाळेत शिकून पारंगत झालेला एक अवलिया विद्यार्थी कृष्णा विठ्ठल पाटील.
कृष्णा विठ्ठल पाटील यांचा जन्म ७ जानेवारी १९२३. जन्म गाव आणि मूळ गाव उंदरवाडी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. शालेय शिक्षण जेमतेम आठव्या यत्तेपर्यंतचे. आईवडील लहानपणीच वारल्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या सोळांकुरच्या मावशीने केला. घरची गरीबी, तरीही मावशीने त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा पाया रचला. त्यांचे मामे भाऊ शाळेत शिक्षक. त्यामुळे त्यांनी यांच्या बरोबरच यांच्या लहान दोन भावांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. शिक्षणात कृष्णा पाटलांचे मन रमले नाही. त्यांना शिक्षणाचा जाच वाटू लागला. चित्रपट क्षेत्राचे आकर्षण होतेच. या क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचे असा निश्चय करून त्यांनी कोल्हापूर सोडून थेट मुंबई गाठली.
१९४५ साली मुंबईत दादरला बॉम्बे फिल्म लॅब बाहेर आसरा घेतला. खिशात दमडी नाही. बाहेर फुटपाथवर राहून दिवस काढले. एका लहानश्या हॉटेलमध्ये नोकरी धरली. ते बॉम्बे लॅबमध्ये चहा देण्यास जावू लागले.
त्यांची चित्रपटाबद्दलची आवड व बुद्धिमत्ता बघून कै. वसंतराव जोगळेकरांनी त्यांना आपले सहाय्यक नेमले. त्यांच्याकडे विश्वासू सहाय्यक म्हणून काम केल्यावर ते सुप्रसिद्ध दिग्दर्शक माधव कांबळेंच्या संपर्कात आले. माधव कांबळेंकडून त्यांनी दिग्दर्शनाचे धडे घेतले. माधव कांबळे खर्या अर्थाने त्यांचे गुरु..
इथून पुढे त्यांच्या निर्मिती – दिग्दर्शनाच्या कार्यास सुरवात झाली.
१९५० ते १९९० या चार दशकाच्या आपल्या कार्यात त्यांनी निर्माते दिग्दर्शक म्हणून पाच चित्रपट केले तर पाच चित्रपटांचे दिग्दर्शन केले. एका सिनेमाचे संकलन केले. सर्वात प्रथम १९५२ साली त्यांनी “ पुरुषाची जात ‘ या चित्रपटाचे संकलन केले. आपणही दिग्दर्शन – लेखन करावे ही इच्छा बाळगून गजानन शिर्के यांच्या “ गुरुची विद्या गुरूला “ ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्याच बरोबर कथा, पटकथा सुद्धा त्यांनीच लिहिली होती. त्यानंतर १९६४ साल उजाडले. “ वाघ्या मुरळी “ नावाच्या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली. सामाजिक विषयावर आधारित हा चित्रपट खूप गाजला. रमेश देव नायक आणि नलिनी चोणकर नायिका.
निर्मिती – दिग्दर्शन – कथा – पटकथा – संवाद आणि संकलन इतक्या महत्वाच्या बाबी कृष्णा पाटील यांनी यशस्वीरीत्या सांभाळल्या होत्या. प्रचंड गाजलेली ‘नाच्याची’ भूमिका गणपत पाटलांना याच चित्रपटात पहिल्यांदा कृष्णा पाटील यांनी करायला लावली आणि पुढे इतिहास घडला.
त्या नंतर त्यांनी “हेमंत चित्र” ही चित्रपट संस्था काढली. “ बाई मी भोळी “ हा चित्रपट या संथेमार्फत तयार करण्यात आला. दिग्दर्शन अर्थात कृष्णा पाटीलांनी केलं. ग्रामीण तमाशापट असलेला हा चित्रपट खुनाच्या कथेवर आधारित होता. यात जयश्री गडकर, सूर्यकांत, गणपत पाटील व मधु आपटे यांच्या भूमिका होत्या.
श्रीकांत मोघे, राजा गोसावी, उमा भेंडे, भारती मालवणकर – मंगेशकर, दामू अण्णा मालवणकर यांना घेवून 1967 साली “ दैव जाणिले कुणी “ हा सामाजिक विषयावरील चित्रपट निर्माण केला. याची कथा संकल्पना व दिग्दर्शन कृष्णा पाटीलांनी केलं होत. या नंतर त्यांनी “औंदा लगीन करायचे” या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन केले. दादा कोंडकेंच्या सिनेमातील गाजलेली आई रत्नमाला , दादा साळवी , सरला येवलेकर, मधु आपटे, नर्गिस बानु आणि रत्नमाला यांचे सुपुत्र जयकुमार हे या चित्रपटातील कलाकार होते. लग्न आणि त्यामधील गोंधळ, समज – गैरसमज या विषयावर हा चित्रपट आधारित होता. “ बोला दाजीबा “ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. निर्मिती, दिग्दर्शन, संकलन त्यांचेच होते. अविनाश मसुरेकर , लक्ष्मी छाया , बाबुराव माने, ज्योति चांदेकर, धुमाळ आणि गणपत पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या. गेस्ट कलाकार म्हणून मास्टर भगवान यांनी एक लहानशी भूमिका केली होती.
या त्यांच्या ५८ ते ९० कालावधीत त्यांनी पाच चित्रपटाचे दिग्दर्शन संकलन केले. “ गुरुची विद्या गुरूला “, “ सून माझी सावित्री “ , “ कौल दे खंडेराया “ “ एक माती अनेक नाती “ आणि “ “ बाईने केला सरपंच खुळा “. च्ंद्रकांत , सूर्यकांत, जयश्री गडकर, वसंत शिंदे, राज शेखर, भालचंद्र कुलकर्णी, कुलदीप पवार या सारख्या त्या वेळेच्या दिग्गज कलाकारांना घेवून त्यांनी चित्रपट बनवले.
नवीन कलाकारांना संधी आपण दिली पाहिजे या विचाराने कुलदीप पवार – भालचंद्र कुलकर्णी – जयकुमार यांना प्रथम चित्रपटात काम करण्याची संधी कृष्णा पाटीलांनी दिली. हृदयनाथ मंगेशकरांच्या पत्नी भारती मालवंकर – मंगेशकर , व आघाडीची नायिका तेजस्वी पंडित हिची आई ज्योति चांदेकर – पंडित यांना नायिका म्हणून पाटीलांनी प्रथम संधी दिली.
नवीन कलाकारांबरोबर अनुभवी कलाकार – तंत्रज्ञ यांचा सुरेख संगम त्यांच्या चित्रपटात पाहायला मिळतात. त्यांच्या बरोबर काम केलेले सुप्रसिद्ध संगीतकार राम कदम, भारत रत्न लता मंगेशकर, द. का. हसबनीस, जगदीश खेबुडकर, पी.सावळाराम, रंजन साळवी, सुधीर फडके, महेंद्र कपूर, मन्ना डे , सुलोचना, चित्तरंजन कोल्हटकर, बाळ पळसुळे , राजा परांजपे, आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर ही दिग्गज मंडळी. राम कदम यांनी गायलेले व स्वरबद्ध केलेले भारुड “ आली आली हो भागबाई “ खूप फेमस झाले.
घरी चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना कोल्हापुरातील एका लहानश्या खेड्यातुन तेरा वर्षाचे असताना आठवी वी पास कृष्णा पाटील पळून जावून मुंबई गाठतात आणि चित्रपट सृष्टीत आपले बस्तान बसवतात. अशक्य वाटावं असाच यांचा प्रवास. ग्रामीण प्रेक्षकांची नस पकडून त्यांची घडिभराची करमणूक करणारा सिनेमा क्षेत्रातला हा दीपस्थंभ ठरला. माणसं ज्ञानाने मोठे असतीलही, त्यांचे मोठेपण त्यांची विदवत्ता सांगत असते. कलेच्या क्षेत्रातील विदवत्ता ही अनुभवातूनच साकारत असते. किती चित्रपट काढले त्यांची संख्यात्मक वाढ न पाहता त्यांचा दर्जा पाहणं या क्षेत्रात महत्वाचं असत. त्या मुळे अकरा चित्रपटांची निर्मिती – दिग्दर्शन केले असले तरी जे केले ते अस्सल आणि बावनकशी सोने होते. प्रत्येक चित्रपटाच्या नावावरून त्यांची प्रतिभा लक्षात येते.त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला गावाकडच्या मातीचा सुघंध होता, रंग होता. कारण ग्रामीण प्रेक्षक हाच त्यांच्या जीवाभावाचा मैतर होता. असा हा सालस, शांत आणि शिस्तबद्ध कलाकार …
३० जुलै १९९५ रोजी ते स्वर्गवासी झाले. त्यांच्या या पुण्यतिथि निमित ही आठवण…
(हेमंत पाटील हे निवडणूकविषयक सल्ला व्यवसाय करतात. कृष्णा पाटील यांचे ते सुपुत्र.)