मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारने मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ७८ यूट्यूब न्यूज चॅनेल आणि त्यांचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. आयटी कायदा २००० च्या कलम ६९-अ चे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.
सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने गेल्या दोन वर्षांत ५६० यूट्यूब यूआरएल ब्लॉक केले आहेत. ब्लॉक केलेल्या यूट्यूब न्यूज चॅनेल्सवरील दर्शकांची संख्या ६८ कोटींपेक्षा जास्त होती. मंगळवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी ही माहिती दिली. तामिळनाडूच्या विरुधुनगरमधील काँग्रेस खासदार मणिकम टागोर बी यांनी सरकारने बंद केलेल्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या संख्येचा तपशील मागितला होता.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यापूर्वीही अशीच कारवाई केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला देखील १६ यूट्यूब चॅनल्स बंद करण्यात आल्या होत्या. यापैकी १० भारतीय चॅनेल आणि ६ यूट्यूब न्यूज चॅनेल पाकिस्तानमधून कार्यरत आहेत आणि भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेमध्ये भारताची प्रतिमा खराब केल्याच्या आरोपामुळे ब्लॉक करण्यात आले होते. आयटी कायदा २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
५ एप्रिल रोजी करण्यात आली होती कारवाई
- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ५ एप्रिल रोजी आपत्कालीन शक्ती वापरून आयटी कायदा २०२१ अंतर्गत कारवाई केली होती.
- या कारवाईत २२ यूट्यूब न्यूज चॅनेल, तीन ट्विटर अकाऊंट आणि एक फेसबुक अकाऊंटसह एक न्यूज वेबसाइटही बंद करण्यात आली.
- या चॅनेल्सची व्ह्यूअरशिप २५० कोटींहून अधिक होती.
- या चॅनल्सद्वारे भारतीय लष्कर आणि भारताचे परराष्ट्र संबंध अशा विषयांवर चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात होती.