मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या बर्याच भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून जिरायत शेतीला तात्काळ ५० हजार व बागायत शेतीला एक लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी आणि एसटी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपयांची मदत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र, अशा संकटकाळात महाराष्ट्रातील जनता संकटात असताना मंत्रिमंडळ जागेवर नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
राज्यात वीजेची २० टक्के दरवाढ झाली आहे. ही दरवाढ सर्वसामान्य माणसाला परवडणारी नाही. पेट्रोल – डिझेलचे दर कमी करुन दिलासा दिल्याचे दाखवण्यात आले आहे मात्र तो दिलासा विजेचे दर वाढवून हिरावून घेण्याचे काम सरकारने केले असाही आरोप जयंत पाटील यांनी केला.
मागच्या अर्थसंकल्पातील कामे आणि आताच्या कामांना स्थगिती दिली ती उठवावी अशी मागणी करतानाच सरकारे येत असतात… जात असतात.त्यामुळे जनतेच्या कामांना स्थगिती देणे योग्य नाही त्यामुळे तात्काळ ती कामे सुरु करावीत असेही जयंत पाटील यांनी सांगितले. स्थगिती चालू कामांना देणं हे तात्पुरते असते नंतर ती कामे करावीच लागतात असेही जयंत पाटील म्हणाले.
सुरेश धस काय आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्याबद्दल जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. आम्ही चुकीचं काम कधी करत नाही. मराठवाड्यातील आष्टी – पाटोदा या भागात कृष्णेचे पाणी पोहोचविण्याची जी योजना होती त्यासाठी रितसर निविदा निघाल्या आहेत. मराठवाडयाला पाणी द्यायची योजना महाविकास आघाडी सरकारची होती. ही योजना नको असेल तर सरकारने निर्णय घ्यावा हे सरकार मराठवाड्याला पाण्यापासून वंचित ठेवत असेल तर… मात्र हे नवं सरकार तसं काम करणार नाही याची खात्री आहे मात्र तसं केलंच तर जनतेला काय चालले आहे हे नक्कीच कळेल असेही जयंत पाटील म्हणाले.
राज्यातील राजकीय घडामोडीवर तीन सदस्य खंडपीठ नेमलेले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात योग्य निर्णय लागेल. शेवटी कायदा कशासाठी पक्षातंर्गत थांबवण्यासाठी आहे. पक्षातंर्गत झाल्यावर सुप्रीम कोर्टाने तात्काळ आदेश द्यायला हवा होता आता ते घडेल असे वाटते. पक्षातंर्गत कायदा, नियम पायदळी तुडवून कोण सत्तेत येत असेल तर कडक कारवाईही करण्यात यायला हवी असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
सरकारचा विस्तार करणं न करणं त्यांचा विषय आहे. मात्र महाराष्ट्रातील जनता संकटात असताना मंत्रीमंडळ जाग्यावर नाही याबाबत जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली.