मु्क्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगली प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चीट दिल्यानंतर आता त्यांच्याविरोधात ज्यांनी मोहीम राबवली त्यांचे बुरे दिन सुरु झाले आहेत. तिस्टा सेटलवाड यांच्या अटकेनंतर त्यांना अडचणीत आणणारी माहिती त्यांच्याच एका माजी सहकाऱ्याने विशेष तपास पथकाला दिली आहे. रईस खान याने दिलेल्या जबानीनुसार, काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी तिस्टाला लाखो रुपये देऊन मोदींना संकटात आणण्याचा प्रयत्न केले होते. काँग्रेससाठी अशी माहिती उघड होणे, हे गुजरात निवडणुकीसाठी अडचणीचं आहे. त्यामुळे काँग्रसने भाजपावर प्रतिहल्ला करून उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
नेमकं काय घडलं?
- २००२ च्या गुजरात दंगलीचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) समाजसेविका तिस्टा सेटलवाड यांच्याबाबत मोठा गौप्यस्पोट केला आहे.
- तिस्टा सेटलवाड यांचा माजी सहकारी रईस खान पठाण याने एसआयटीला धक्कादायक जबानी दिली आहे.
- रईस खान पठाणने दिलेल्या माहितीनुसार २००२च्या गुजरात दंगलीनंतर तत्कालीन राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी तिस्टा सेटलवाड यांना पहिल्यांदा सर्किट हाऊसमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते.
- अहमद पटेल यांनी तिस्टाला बाबरी मशीद दंगलीतील तिची समाजसेवेची भूमिका माहीत असल्याचे सांगितले.
अहमद पटेलांकडून तिस्ता सेटलवाड यांना लाखो रुपये!
- रईस खान पठाण यांच्या जबानीनुसार, अहमद पटेल यांनी तिस्टा सेटलवाड यांना त्यांच्याच पक्षाकडून आणि देश-विदेशातील एजन्सींकडून निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
- सुरुवातीला ५ लाख रुपये तिस्टा सेटलवाड यांना देण्यात आले.
- त्यानंतर पुन्हा तिस्टा सेटलवाड यांच्याकडे २५ लाखांची रक्कम देण्यात आली.
तिस्टा सेटलवाड यांना हवालाद्वारे परदेशातून खूप पैसा!
- तिस्टा सेटलवाड आणि त्यांचे पती जावेद आनंद प्रकाशित करत असलेल्या ‘कम्युनॅलिझम कॉम्बॅट’ मासिकासाठी परदेशातून निधी मिळत असे.
- ज्या कामासाठी परकीय निधी प्राप्त झाला होता त्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबींवर खर्च करणे हे एफसीआरएचे थेट उल्लंघन मानण्यात आले.
- त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केंद्र सरकारने तिस्टा आणि तिचे पती जावेद आनंद यांच्या सबरंग ट्रस्टचा एफसीआरए परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
- हा ट्रस्ट एफसीआरएचे उल्लंघन करत असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे.
- ते देशविरोधी कारवायांमध्ये परकीय पैसा वापरतात असाही आरोप करण्यात आला आहे.